पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटी जवळच्या पोलीस ठाण्यावर खबर दिली. तेथील अधिकारी म्हणाला की जर आपण दहा रुपयांचे बक्षीस लावले तर त्यामुळे लोक शोध लावतील. त्या काळात दहा रुपये म्हणजे प्रचंड रक्कम. परंतु नाइलाज झाला. अशी दवंडी सर्वत्र देण्यात आली.
 एक दिवस एक गुराखी आपली जनावरे भोवतालच्या जंगलात चारून सायंकाळी घरी परत घेऊन येत होता. त्या पायवाटेवरील एका झुडपापाशी प्रत्येक म्हैस येऊन हुंगून बाजूने परत जात असे. त्यालाही आश्चर्य वाटले. तेथे गेल्यावर त्याला दोन लहान मुले एकमेकांना कुशीत घेऊन गाढ झोपलेली आढळली. मनुष्यवस्तीपासून इतक्या दूरवर ही मुले आलीच कशी व येथे येऊन कशी झोपली? हा प्रश्न त्याला पडला. तेव्हा त्याला ऐकलेल्या दवंडीची आठवण आली. दोन्ही मुलांना खांद्या- पाठीवर घेऊन तो परत आला. मुलांना पाहून त्या नवरा-बायकोला किती आनंद झाला असेल ही कल्पनाच करवत नाही. आता प्रश्न आला की त्याला बक्षीस कसे व कोठून द्यावयाचे? त्या नवरा-बायकोने त्याचे पाय धरून सत्य परिस्थिती सांगितली. अत्यंत गरीब असूनही तो गुराखी सहृदय होता. त्याने आपली ती बक्षिसाची मागणी परत घेतली. एवढ्या घनदाट जंगलात ही मुले गेली कशी व सात दिवस अन्नपाण्यावाचून कशी जगली? ती जेथे सापडली तेथे भोवताली अनेक जंगली जनावरांच्या पायखुणा होत्या. भोवताली कमीतकमी चार वाघ, अस्वले असे प्राणी वास्तव्य करत होते. ते तेथून गेल्याच्या पायखुणाही होत्या. वाघ जर क्रूर असेल तर या सहज मिळालेल्या भक्ष्याला सोडून पुढे का गेला? याला एकच उत्तर येणे सहज वाटते. ते म्हणजे ही मुले व तो वाघ यांच्या अंतर्मनाची काहीतरी एकरूपता - काही संबंध असावा.
 दुसरी कहाणी प्राण्या-प्राण्यांच्या संबंधी आहे. उत्तर प्रदेशाच्या एका जंगलात एका झुडपात आपले पाडस ठेवून हरिणी चरावयास गेली होती. एक वाघीण त्या पायवाटेने जात असताना त्या झुडपापाशी आली. तिच्या नजरेला ते पाडस आले व पाडसाला ती दिसली. ते पाडस तर अगदी निरागस. त्याला शिकवणारी, संभाळणारी माता तेथे नाही. त्याला भीतीही माहीत नव्हती. ते पाडस शेपूट हलवत त्या वाघिणीपाशी गेले. तिला हुंगू लागले. आश्चर्य असे, ज्या वाघाला आपण अत्यंत क्रूर मानतो, त्या जातीची मादी त्या पाडसाला हुंगून त्याला काहीही न करता ३१