पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जरुरी नाही. त्या अडचणींचा थोडक्यात आढावा घेऊ. ऊर्जा ही नेहमीच कोरड्या (न शिजवलेल्या) घटकांची मोजली जाते. कर्बोदके ४ कॅ. प्रतिग्रॅम, प्रथिने ४ कॅ. प्रतिग्रॅम व तैल पदार्थ ९ कॅ. प्रतिग्रॅम ऊर्जा देतात हे विश्वमान्य आहे. आता कर्बोदके म्हणून भात, चपात्या हे आपले रोजचे पदार्थ. आपण काही स्वयंपाकाच्या ओट्यावर काटा ठेवून वजने करत नाही. ते हास्यास्पद होईल. असे सांगणाराही पढतमूर्ख ठरेल. पण तांदळाचे उदाहरण पहा. तांदळाच्या जातीनुसार, कणाचा, आकार, लहान मोठा यावर १ वाटी तांदळाचे वजन अवलंबून राहील. मग 'क्ष' ऊर्जा मिळण्यासाठी किती तांदूळ घ्यावेत हा एक यक्षप्रश्नच ठरेल. तसेच १ वाटी भात म्हणजे १०० ग्रॅम वजन त्यातून १०० कॅ. मिळतील. पण भात कोरडा असेल व अगदी मऊ भरपूर पाणी घालेला असेल तर वजनात फरक पडेल. (मधुमेह हे पुस्तक पाहा.) ही वजने सरासरी आहेत. समजा यात मतभेद झाले तर तिकडे काणाडोळा करणे इष्ट.
 (४) पोषक घटकांची कोष्टके सुद्धा या पुस्तकात दिली आहे.
 (५) आहारात भरपूर ताक, दूध, पाले भाज्या, फळ भाज्या, बीन्स यांचा वापर करावा. कमी ऊर्जा देणारे पदार्थ जरी जास्त खाल्ले गेले तरी अपाय होणार नाही.
 (६) अन्नात बदल जरूर करावा. परंतु पाया विसरू नये. कोष्टकात निरनिराळ्या पदार्थांची यादी दिली आहे.
 (७) संस्कारित अन्न (Fast Food) पेप्सी सारखी पेये ही टाळावीत. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी, निसर्गनिर्मित घरगुती अन्न हे श्रेष्ठ आहे.
 (८) आहार दर ४-५ तासांनी थोडाफार घ्यावा. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, मध्ये थोडेसे चाऊं व चहा व रात्री ८ पूर्वी जेवण व १० वा. झोप ही दिनचर्या हितकारक ठरेल.

 विकारमुक्ती व आरोग्यासाठी आजीबाईचा बटवा व आहार यांचे थोडेफार ज्ञान आवश्यक आहे. आरोग्याची शिडी अशी आहे : (१) प्रथम स्थानी अध्यात्म, (२) आहार (३) व्यायाम व योगसाधना ही दैनंदिन व अखंड आयुष्यभराची जरुरी.

३१९