पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उरली वैद्यकाची मदत. (४) वैद्यक जरुरीनुसार अटळ परंतु औषधांची जरुरी कमीत कमी असावी. पहिल्या तीन घटकांशिवाय वैद्यक हा घटक कधीच पूर्ण यश देऊ शकणार नाही.
 यजुर्वेदातील शांतिपाठात खालील प्रार्थना आहे.
 "पश्येम शरदः शतम् । जीवेम शरदः शतं ।
 शृणुयाम शरदः शतम् । भूयच्छ शरदः शतात् ॥
ही प्रार्थना इच्छादर्शी आहे. "आम्हाला शंभर शरदऋतू (वर्षे) दिसोत. आम्हाला शंभर शरद आयुष्य लाभो, इत्यादी”. आपण शतायुषी व्हावे एवढेच नन्हे सर्व इंद्रियेही चांगली राहावीत ही प्रार्थना. मला यात जास्त खोल विचार दिसतो. नुसतेच शंभर वर्षे जगणे नको तर नेत्र, कर्ण, वाणी ही इंद्रियेही उत्तम राहिली पाहिजेत. याचे सार म्हणजे आम्हा शंभर वर्षे निरामय जीवन लाभो.
 ही प्रार्थना आहे स्वतःसाठी तर दुसऱ्यांना सदिच्छा देण्यासाठी पुढील श्लोक आहे.
 "सर्वेऽत्र सुखिन: सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ।
 सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित दुःखभाग भवेत ॥
 सर्वजण सुखी होवोत, सर्वांना निरामय जीवन लाभो, सर्वांना चांगले (दिवस-काळ) दिसो व कोणाच्याही वाट्यास दुःख न येवो. आपले कल्याण व्हावे तसेच दुसऱ्याचेही व्हावे ही इच्छा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. हीच मनाची उन्नत अवस्था.

। इत्यलम् ।
३२०