पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निघून गेली. या गोष्टीचा अर्थ काय लावावयाचा? वाघांना शिकार काही सहजासहजी लाभत नाही. कष्ट करावे लागतात व मोठी शिकार मिळाली की ती दोन-तीन दिवस खाऊन नंतर वाघ पुढे जातो. येथे आयते ताजे कोवळे अन्न आपल्या पायांनी चालत येऊनही ती वाघीण त्याला काही न करता पुढे निघून जाते यात व्यवहारापेक्षा त्यांच्या मनाची स्थितीच जास्त कारणीभूत असावी. म्हणजेच मन हे व्यक्तिगत स्वरूपाचे नसून सर्वांचीच अंतर्मने समानच नव्हे तर एकच असतात असे म्हणावे लागेल.
 अत्यंत संकटकाळात प्राणी मानवाचा शोध घेत त्याकडे आधारासाठी धावत येतात. एका सांबराच्या मागे कोळशिंदे (रानटी कुत्री) लागली होती. कोळशिंदे पळता पळता भक्ष्याचा जो अवयव सापडेल तो अत्यंत घट्ट पकडून ठेवतात व शेवटी सर्वजण मिळून भक्ष्याला आडवे करून त्याचे तुकडे तोडून खातात. ते वाघाला सुद्धा घाबरत नाहीत. बिबट्या त्यांच्यापासून वाचण्यासाठी झाडावर चढून बसला तर ते झाडाखाली बसून राहतात. ढाण्या वाघाचा संपूर्ण जंगलात केवढा दरारा ! हत्तीसकट सर्व प्राणी त्याला घाबरतात. पण हा वाघ मात्र कोळशिंद्यांपुढे शेळी होतो. कोळशिंद्यांनी वाघ मारून खाल्ल्याच्या अनेक घटना निरनिराळ्या शिकाऱ्यांनी लिहून ठेवलेल्या आहे. असे हे कोळशिंदे मागे लागल्यामुळे ते सांबर जंगलात शिकाऱ्यांनी ठोकलेल्या राहुटीत शिरून उभे राहिले. भोवताली माणसे खूप होती. परंतु कोळशिंद्यापेक्षा त्याला माणूस आधार घेण्यास विश्वासार्ह वाटला. कोळशिंद्यापासून सुटका नाही ही खात्री. प्रत्यक्ष वाघसुद्धा मानवाच्या आश्रयाला आल्याची उदाहरणे आहेत. जंगलातील बंगल्याच्या एका खोलीत वाघ शिरून बसून राहिलेला. तो अतिशय आजारी, अंगावर अनेक क्षते. तो कसा आला, आत कसा शिरला कोणालाही कळले नाही. शेजारच्या खोलीत तेथील जंगलाचा अधिकारी शांतपणे झोपला होता. वाघाने सर्वांना पाहूनही हल्ल्याची कोणतीही हालचाल केली नाही. परंतु शेवटी तो वाघ. त्याला गोळ्या घालून मारले तेव्हा त्याने आवाजसुद्धा न करता प्राण सोडला. बिबटे तर मनुष्यवस्तीभोवती वावरत असतात. कुत्री, कोंबड्या, बकरी हे त्यांचे खाद्य. पण माणसाला मारून खाल्ल्याची एकही खरी कहाणी सांगता येणार नाही. अपवाद फक्त नरभक्षकाचा. वर उल्लेख केलेला वाघ जंगलातील बंगल्यात केवळ आधाराकरिता आला होता. ३२