पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्याला सहज येणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या अनुभवामुळे अनेक लोकांना मांसाहार हा घृणास्पद वाटतो. वैज्ञानिक दृष्ट्यासुद्धा मांसाहार हा शाकाहारापेक्षा कनिष्ठच आहे हे सिद्ध झालेले आहे. वरील सर्व कहाण्यांत त्या वर्तणुकीला काही कारणे सांगता येतील व लोक त्यावर सहज विश्वास ठेवणार नाहीत. परंतु मानव आणि प्राणी यांच्या मनोमीलनाची, एकमेकांच्या भावभावना जाणून साहाय्य करण्याची तीव्र इच्छा ह्या गोष्टी निश्चितच प्राणी व मानव यांचे मित्रसंबंध दाखवण्यास पुरेशी आहेत.
 कुत्रा हा तसा अतिशय बुद्धिवान प्राणी आहे व मानवाचा सच्चा मित्र आहे. जे. अॅलन बून हा एकेकाळी आर. के. ओ. या चित्रपट स्टुडिओचा प्रमुख होता. त्याची अशी दृढ धारणा आहे की मानव व प्राणी यांची मने अगदी एकसारखी किंबहुना एकच आहेत. त्याचे 'अखिल प्राणीमात्रांशी नाते' (Kinship with all life) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचे 'स्ट्राँगहार्ट' नावाच्या जर्मन शेफर्ड / अल्सेशिअन कुत्र्याशी प्रेमाचे नाते जडले होते. हा कुत्रा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चँपिअन आला होता आणि अनेक चित्रपटांत त्याने काम केले होते. या कुत्र्याने त्याच्यावर इतके संस्कार केले की बूनच्या मनाविषयीच्या संपूर्ण कल्पनाच बदलून गेल्या. जेव्हा हा कुत्रा नकडे आला तेव्हा बनला सल्ला देण्यात आला होता की त्या कुत्र्याला प्रतिमानव समजूनच वागवावे. बूनने त्या 'स्ट्राँगहार्टशी' विशेष बोलू नये परंतु नियमितपणे काहीतरी वाचून दाखवावे. हे वाचन मात्र सटर फटर असू नये तर तात्त्विक - महत्त्वाचे असावे. पण स्ट्राँगहार्ट बूनच्या घरी आल्यापासून जीवनशैलीविषयी काही अडचणी येऊ लागल्या. बूनने स्ट्राँगहार्टकडे तक्रार केली. स्ट्राँगहार्टने ते शांतपणे ऐकून घेतले व मूकनाट्यद्वाराच जणू त्याच्या वागणुकीचे विश्लेषण केले. बूंन म्हणतो -
"मी स्ट्राँगहार्टशी आपल्या भाषेत माझे विचार, माझ्या भावना, आवाज व शब्द याद्वारे सांगितल्या. त्याला ते विचार पूर्णपणे समजले. त्याने त्याची उत्तरे त्याच्या भाषेत दिली. ही भाषा म्हणजे निरनिराळे स्वर व मूकनाट्य, जे मला सहज समजेल अशा भाषेत तो मला सांगत होता. स्ट्राँगहार्टला माझे बोलणे पूर्ण समजत होते व त्याचे मला." ३३