पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आत्मा हा चेतन आहे. तो अजर, अमर, अविनाशी आहे. आत्मा गुणांचा समूह आहे. ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप हे त्याचे गुण आहेत. ज्याप्रमाणे सूर्य व सूर्यप्रकाश एकच आहे तसेच आत्मा आणि त्याचे गुण हे अभेद्य आहेत. आत्म्याला रंग, रूप, आकार नाही. या आत्म्याला ओळखावयाचे आहे, त्याची ओळख करावयाची आहे, म्हणून स्वतः ने स्वतःची ओळख करून घ्यावयाची आहे. असा हा आत्मा सर्वांभूती आहे."
 असेच केलेले काही प्रयोग अजूनही विश्वास न वाटणाऱ्या कहाण्या सांगतात. असे प्रयोग पिअरे डुअल व माँत्रेदान या फ्रेंच वैज्ञानिकांनी केले होते. त्यांनी एक पिंजरा बनवला व त्याचे एका बुटक्या भिंतीने दोन भाग केले. त्यांनी एका जनरेटरमधून कोठल्याही एका भागाला विजेचा क्षणभराचा शॉक दर मिनिटास देण्याची व्यवस्था केली. त्यात 'जर्बिल' (-होडंटची एक जात) व 'हॅमस्टर' (बिळात राहणारी उंदरासारखी जात) आत ठेवले. ही मधली भिंत छोटी असल्यामुळे ते एका भागातून दुसऱ्या भागात पटकन उडी मारून जाऊ शकत. हे जे विद्युत झटके एका वेळेस पिंजऱ्याच्या एकाच भागाला दिले जावयाचे त्याला काहीही नियम नव्हता, अनुक्रम नव्हता. त्यात निरीक्षण करणाऱ्यांचा काहीही हस्तक्षेप नव्हता. तो जनरेटरच अनियमित चालून झटके द्यावयाचा. पण या प्राण्यांना जणू अंतर्ज्ञानाने अथवा इंद्रियांच्या साहाय्याशिवाय टेलिपथीने आधीच कोठे झटका येणार आहे हे कळावयाचे व झटका बसण्यापूर्वीच ते दुसऱ्या भागात उडी मारून जावयाचे. पण हे कसे व्हावयाचे? यात माणसाचा हस्तक्षेप नव्हता, काहीही प्लॅन नव्हता, आणि प्राण्यांची एका भागातून दुसऱ्या भागात जावयाची क्रिया इलेक्ट्रॉनिक मशिनने नोंदली जावयाची. याचे तात्पर्य एवढेच निघते की ते जर्बिल व हॅमस्टर यांची मने फक्त वर्तमानकाळाशी वा अनुभवाशी निगडीत नव्हती परंतु ती भविष्यातही प्रवास करू शकत होती. असाच प्रयोग बेस्टाल व जेम्स यांनी घुशी आणि उंदीर यांचेवर केला. त्यांनी एक असा चक्रव्यूह निर्माण केला की ज्याला दोन मार्ग होते. पण या घुशी व उंदीर यांना जणू पूर्वकल्पनेने कोणता मार्ग बरोबर कोणता चूक हे सहज कळत असे, जणू त्यांना अंतर्ज्ञानाची देणगी होती. यामुळे ते योग्य मार्ग सहज जाणून ती गुंतागुंत सोडवावयाचे.
३६