पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असाच एक प्रयोग एक कुत्री व तिचे छोटे पिल्लू यांवर केला. या दोघांनाही असे शिक्षण दिले की वर्तमानपत्राची गुंडाळी घेऊन मारावयाचा आव आणला की ती भीतीने अंग चोरून घ्यावयाची. हे त्यांच्या अंगी बाणल्यावर त्यांना एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या खोल्यांत ठेवण्यात आले. नंतर ज्या ज्या वेळी त्या पिल्लाला वर्तमानपत्राच्या सुरळीने मारावयाचे नाटक केले; तेव्हा ते पिल्लू तर भीतीने अंग आखडून घ्यावयाचे, पण पलीकडच्या खोलीत बंदिस्त केलेली त्या पिल्लाची आईसुद्धा अंग आक्रसून घ्यावयाची. कुत्र्यांबद्दल, त्यांची बुद्धिमत्ता व प्रेम याबद्दल अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यांचेच एक पुस्तक प्रसिद्ध होऊ शकेल. अशाच कहाण्या इतर प्राण्यांच्या आहेत, ज्याचे नमुने आपण पहिले आहेत, ऐकलेलेही असतात. ह्या विषयात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सर्व दृष्टिकोनातून काळजी घेतली होती. मालकीण आजारी पडली, तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले तर तिच्या मांडीवर असलेल्या कुत्र्याचेही ठोके वाढले अशी कहाणी आहे. दुसऱ्या खोलीत कुत्र्याला कोंडून मालकीण वेगळ्या खोलीत ठेवली. एक अत्यंत अनोळखी माणूस आला, त्याने त्या बाईला अर्वाच्य भाषेत दम दिला, धमक्या दिल्या. मालकिणीचे हृदयाचे ठोके वाढले, भीतीने ती घाबरी झाली व त्याच वेळी साऊंडप्रूफ खोलीत ठेवलेल्या तिच्या कुत्र्याचीही तीच अवस्था झाली होती. अशा कहाण्या माणूस व प्राणी यांच्या मनाच्याच एकरूपतेच्या कथेला पुष्टीच देत असतात किंवा एकूण मनच सर्वत्र एक आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढलेला आहे.
 हे झाले प्राण्यांच्या बाबत. पक्ष्यांचे काय? एका बंद पेटीत घालून कित्येक मैल दूर नेऊन सोडलेली कबुतरे न चुकता घरी परत येतात. थंड प्रदेशातून थंडीत अनेक पक्षी हजारो मैल दूर ठराविक ठिकाणीच थंडी चुकवणे व वंशसंवर्धन यासाठी अनेक आशियाई देशांत येतात. हे कसे घडते. काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की सूर्य व तारे यावरून पृथ्वीवरील ठराविक ठिकाणी ते येत असतात. परंतु ही धारणा उणी पडते. ह्या प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी कधीच न पाहिलेल्या ठिकाणाहून आपले संकल्पित ठिकाणाकडे अचूक प्रयाण केले होते. मानवाला नवीन शहरात उतरलेल्या ठिकाणापासून दूर नेऊन सोडले तर परत येणे कठीण होते. असे रस्ता चुकणे, दिशेचे भान न राहणे ही मानवाचे बाबत अगदी सहज होणारी गोष्ट आहे. म्हणजे मानवाच्या अंगी पक्ष्यांना मिळालेली अशी देणगी अभावानेच दिसते किंवा पूर्वी ही ३७