पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेत असतो. आपले त्यांच्याशी मनोमीलन झालेले असते. सेंट फ्रान्सिसचे तत्त्वज्ञान, लीन व्हाईट व ल्याल वॅटसन यांचे या विषयावरील चिंतन व आपले तत्त्वज्ञान एकच आहे. त्यांचे व आपले मन म्हणा आत्मा म्हणा एकच आहे म्हणूनच असे समविचार जन्मास येतात.
 आणि जेव्हा आपण प्राण्यांशी बोलू शकतो असे म्हणतो, तेव्हा ते अशक्य वाटते. पण भाषा म्हणजे काय? शब्द हे कशासाठी हवेत? भाषेची खरंच आपण समजतो तेवढी सतत जरुरी असते का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार भाषा ही एक काल्पनिक जुळणी असून, ध्यानधारणा (विपश्यना) करण्यासाठी याची जरुरी नाही. म्हणून मौनाला त्यात महत्त्वाचे स्थान आहे. भाषा ही अंतिम मुक्तीला साहाय्यकारक नाही. पण भाषा या शब्दाचा बोलणे हा अर्थ आहे. याउलट भर्तृहरी म्हणतो ब्रह्म हेच शब्दतत्त्व आहे, हे तत्त्व अनादिकालापासून अस्तित्वात असून ते शब्द हेच विचार व भाषा यांचा उगम आहे. शब्दच नाहीत असे काहीही व्यवहार नाहीत. शब्दच शक्ती देत असतात. भर्तृहरीच्या शब्दांत ब्रह्म हेच मुळी शब्दांकित आहे. म्हणजे भर्तृहरी बौद्धधारणेच्या विरुद्ध मत देतो. शब्द (म्हणजेच वाणी) ही लिखित स्वरूपाच्या विचारांचे रूप आहे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. लिखित ज्ञान म्हणजे शब्दरूपांचे प्रतिबिंब. पण हे सर्व त्याने मानव डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले आहे. शब्द किंवा लेखन याशिवायही विचार व्यक्त करता येतात व शब्दहीन अशी भाषा असू शकते. जाणिवेतून विचार व ते शब्दरूपाने व्यक्त करणे हेच भाषेचे कार्य. भाषा हे एकमेकांना समजावून घेण्याचे माध्यम. म्हणूनच मानवांत निरनिराळ्या जाती-जमाती, निरनिराळ्या खंडांत राहणारे लोक निरनिराळ्या भाषा वापरतात. भाषा वेगळी परंतु जाणीव व विचार एकच असतात. हीच गोष्ट मानव व प्राणी, पक्षी यांचेबाबत लागू पडते. आपली भाषा बालपणापासून आपल्याला शिकावी लागते. बहिऱ्या माणसाला बोलता येत नाही पण त्याला देहबोली चटकन अंगी बाणवता येते. म्हणूनच तत्त्वज्ञानात म्हटल्याप्रमाणे “आत्मा हा सर्वांचे ठायी आहे, सर्वत्र आहे." तो जाणून घेतला तर विचारांच्या देवाणघेवाणीसाठी भाषेची /शब्दांची जरुरी उरत नाही.

 ज्ञानेश्वरांनी पसायदानात एक ओवी अशी लिहिलेली आहे -

४३