पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय तत्त्वज्ञान : एक दृष्टिक्षेप

 विकारमुक्तीच्या कार्यात मनःशक्तीचा अतोनात प्रभाव असू शकतो, ही सिद्ध गोष्ट फक्त विज्ञानाचे हत्यार वापरून दाखवता येणार नाही. ह्या मनाचा मुळापासून विचार करावयाचा असेल तर नुसते मानसशास्त्र उपयोगी पडणार नाही. अनुभूतीतून ज्यांना तत्त्वज्ञानात स्थान मिळाले आहे, त्या तत्त्वज्ञानावरच प्रथम दृष्टिक्षेप टाकणे जरूर आहे. हेच आपण आता पाहणार आहोत.

 आज आधुनिक काळात विज्ञानाची कास धरून आपण खूपच प्रगती केली आहे. भौतिक प्रगती अफाट झाली यात वाद नाही, परंतु त्यामुळे व्यक्तीची व्यक्ती म्हणून व अंती समाज म्हणून किती प्रगती झाली? सुखाच्या आजच्या कल्पना म्हणजे फक्त भोगवाद. पण त्याची किंमत आपण किती मोजतो आहोत? आपली मानसिकही अवनती झालेली आहेच. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. पण वैद्यकशास्त्रातील तथाकथित प्रगतीमुळे आपल्या व्यक्तिगत व सामाजिक आरोग्यात किती प्रगती झाली आहे, असा मूलभूत प्रश्न आपणास पडतो. आज अनेक विकारांमध्ये वृद्धी झालेली दिसते. अनेक विकार अंती बरे होणे अशक्य आहे हे सहज दिसते आहे. मग वैद्यकशास्त्रापलीकडे काही आहे का? मन आणि देह यांच्या अतूट संबंधावर आज खूप संशोधन झाले आहे. मन हे अनेक विकारांना कारणीभूत असते व ते उन्नत करणे व त्यावाटे विकारमुक्ती सोपी करणे हे का शक्य

४५