पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असू नये, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. त्यांचाच आपण शोध घेणार आहोत. हा मार्ग म्हणजे आधिभौतिक जीवनाच्या पलीकडे असणान्या विश्वाची शोधयात्रा आहे. अनेक पाश्चात्य संशोधक, शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते यांनी ही यात्रा केली आहे व आपले अनुभवही लिहून ठेवलेले आहेत. डॉ. आइनस्टाईन या सर्व लोकांचे मेरुमणी. परंतु भारतीय वैज्ञानिकही यांत मागे नाहीत. एक अगदी अलीकडचे उदाहरण घेऊ. डॉ. डी. एस्. कोठारी म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्राचे मेरुमणी. दिल्ली विश्वविद्यालयात प्राध्यापक होते. नेहरू विश्वविद्यालयाचे चॅन्सेलर म्हणून काम केले. १९६१ ते १९७३ या कालखंडात युनिव्हर्सिटी ग्रँटस् कमिशनचे चेअरमन होते. पुढे त्यांनी केंब्रिज विश्वविद्यालयाच्या कॅव्हेंडिश प्रयोगशाळा व नील्स बोर संस्थेतही काम केले. न्युक्लिअर व क्वांटम् थिअरीचे ते एक मान्यवर तज्ज्ञ होते. १९८० साली त्यांनी आपला 'अणू व अहं' (Atom and Self) हा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. असे हे कोठारी यांचा भारतीय तत्त्वज्ञान विशेषतः उपनिषदांचा गाढा अभ्यास होता. त्यांना अध्यात्मवादी म्हणता येईल. हे झाले भारतीय विज्ञान श्रेष्ठींचे उदाहरण. पण अशी अनेक उदाहरणे देता येतील. तत्त्वज्ञान व विज्ञान यांचा सुरेख संगम करणारे अनेक आधुनिक वैज्ञानिक व वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ आहेत. तेव्हा हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींना किंवा पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांना त्यांना सापडलेले सत्यच त्या वाङ्मयात आलेले आहे. "मी कोण, कोठून आलो, मृत्यू म्हणजे काय, त्यानंतर मानवाचे काय होते” अशा प्रश्नापासून जीवनाचा अर्थ काय, दीर्घायुष्य कसे मिळवावे व निरामय जीवन कसे प्राप्त करून घेता येईल याचाही त्यांनी शोध घेतला होता. आधुनिक काळात अनेक रोग वाढत आहेत, आरोग्य निम्नस्तरावर जात आहे. आधुनिक वैद्यक पूर्ण विज्ञानाधिष्ठित असूनही त्याला अनेक गोष्टींत अपयश येते 'औषधनिर्मित विकार' हे आता अगदी सामान्य झाले आहेत. पण यांतील विचारवंतांना यातील उणिवांची जाणीव होऊ लागली. वैद्यकाच्याही पलीकडे काही आहे हे नामवंत तज्ज्ञांनाही कळले आहे. तत्त्वज्ञान आणि वैद्यक यांचा संगम अनेक अविश्वसनीय गोष्टी घडवू शकतो, तेव्हा आपले तत्त्वज्ञानच थोडक्यात समजावून घेऊन, मग त्याचा वैद्यकशास्त्रातील यशासाठी कसा उपयोग करून घेता येतो याचा आढावा आपण घेऊ.

४६