पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अध्यात्म म्हणजे काय ?
 अध्यात्म म्हणजे 'अधि + आत्मा'. आत्म्याशी जवळीक साधणे, त्याला जाणून घेणे. आत्मा किंवा ब्रह्म म्हणा - हेच अविनाशी, चिरंतन व अंतिम सत्य आहे. विद्वानांनी त्याच्या केलेल्या व्याख्या अशा आहेत -
 (१) मी कोण म्हणजे स्वतःला जाणून घेणे. आत्म्याला जाणणे (Belonging to Self of a Person) (याच प्रश्नापासून आत्म अध्ययन सुरू होते. हे आत्म अध्ययन म्हणजेच अध्यात्म असे म्हणू).
 (२) मी स्वतः - मजविषयी सर्व काही (Concerning Self).
 (३) अंतिम सत्य किंवा आत्मा व परमात्मा यांचे नाते जाणून घेणे. (The supreme spirit - manifested as supreme Self or relation between the supreme and the individual Soul).) अध्यात्म म्हणजे काही कर्मकांड नाही. हे सत्य ज्ञान आहे. हे ज्याने जाणले तोच आध्यात्मिक, धार्मिक विधींचे कर्मकांड हे अध्यात्म नव्हे.

 या सत्याला ब्रह्म, आत्मा अशी काहीही नावे तत्त्वज्ञानात वापरली गेलेली असोत तेच अंतिम सत्य आहे. महात्मा गांधी म्हणत की "सत्य हाच प मेश्वर". या शब्दत्रयीचा अर्थ अंतिम सत्य असाच मी समजतो. हे वजा केले तर या विश्वात अंतिम असे काहीही नाही. पण अध्यात्म्याचा अनुसर म्हणजे सर्वसंगपरित्याग नव्हे. ते जाणण्यासाठी संन्यास घेण्याचीही जरुरी नाही. संसारात राहूनही प्राणीमात्रावर प्रेम करणे, अंती सर्वांचा आत्मा एकच आहे ही जाणीव बाळगणे, हाही त्याचाच भाग असतो. खऱ्या अर्थाने निसर्ग हीच आपली माता आहे, ती आपणास अनंत गोष्टी शिकवत असते, आपले पालन-पोषणही करत असते. पूर्वी ऋषिमुनी अरण्यात जाऊन तपश्चर्या करत. या विचारमंथनातूनच ज्ञानाच्या अमृताची त्यांना प्राप्ती होत असे. सत्यकामाने अरण्यातच बारा वर्षे राहून 'ब्रह्मज्ञान' मिळविले व तो ब्रह्मज्ञानी झाला. ह्या सर्व गोष्टी म्हणजेच अध्यात्म. त्या ऋषिमुनींना अफाट ज्ञानलालसा होती. आजच्या युगात आपण निदान याद्वारा मनाचे उन्नयन करण्यास शिकू तरीही आपली उन्नती होईल. यातूनच आपली वर्तणूक, सामाजिक जाणिवांचा आदर अशा गोष्टींचा उद्गम होईल.

४८