पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नशिबाने धन दिले होते, ते त्याचे त्यानेच घालवले. तुझा पती जिवंत आहे तोपर्यंत तुला दारिद्र्यातच जन्म कंठावा लागेल.” घरी आल्यावर पत्नीने पतीला विचारले की आयते मिळालेले धन त्याने का नाकारले? हे ऐकून तो शूद्र आश्चर्यचकित झाला. कारण कळताच पत्नीला घेऊन तो नदीकाठी धोब्याकडे गेला व त्याने विचारले, "तुम्हाला नेमके काय म्हणावयाचे आहे?” धोबी म्हणाला, "तू नदीकाठी दिसलेले धन बाजूस सारून घरी गेलास. घरी श्रीशिल्लक काहीही नाही. संसार म्हणजे फक्त हातातोंडाशी गाठ. चैनीत राहता येत नाही. तरीही हे धन नाकारतोस ? जा त्याचा स्वीकार कर."
 शूद्र हसला व म्हणाला, "धोबीबुवा, मला धनाची इच्छाच नाही. त्याने कोणते सुख मिळते, हे सांगता का? उलट त्याची चोरी होण्याचीच भीती. एवढेच नव्हे तर त्यासाठी चोर तुमच्या जिवावर उठण्याचा धोकाच असतो ना? धनामुळे मुलांत भांडणे, नातेवाइकांचा हेवा व राग, माणसे दुरावणे असे सर्व होत असताना ते धन भी कसा घेऊ?"
 यावर धोबी म्हणाला, "अरे पैसा असेल तर मित्र मिळतात, नातेवाईक भोवती गोळा होतात, समाजात मान मिळतो, शिवाय पाणपोया, तलाव बांधणे, मोठे यज्ञ करणे अशी कामेही करता येतात. दान दिल्याने स्वर्गही प्राप्त होतो. मग धन का नको?” यावर शूद्र हसून म्हणतो, “अहो, कामनांचा त्याग म्हणजेच सर्व व्रतांचे पालन, रागावर ताबा म्हणजे तीर्थक्षेत्राचे दर्शन, दया जपाएवढीच मौल्यवान चीज आणि मनाचे समाधान हेच श्रेष्ठ धन आहे. स्वकष्टार्जित साधे अन्न हे अमृतासमान, उपवास ही तप:साधना, परस्त्री ही माता व परक्याचे धन ही माती. हाच माझा यज्ञ. पायाला घाण लागल्यावर ते धूत बसण्यापेक्षा घाणीपासून दूर राहणे हेच हितकारक नाही का?"

 हे त्याचे उद्गार ऐकून स्वर्गातून देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली व धोब्याने आपले श्रीविष्णूचे मूळ रूप प्रगट केले व त्या क्षणी तो शूद्र परिवारासह स्वर्गास गेला. ही कहाणी खरी का खोटी हा वाद निरर्थक ठरेल. ते एक रूपक आहे असे म्हणूया. पुराणे म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचे वाङ्मय. त्यात अशा अनंत कथा आढळतात. ह्या कथा रूपकात्मक समजणे व असे संस्कार पुढील पिढीवर करणे हे

५०