पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचे, असे संस्कार मनाचे उन्नयन करत असतात. आज आपण डोळसपणे पाहू लागलो तर नीति- अनीतीची कवडीचीही पर्वा न करता पैसा ओरबाडून जमा करणे, त्याचा उपयोग व्यसने पूर्ण करण्यासाठी करणे, स्त्रियांवर अत्याचार करून शरीरसुख बलात्काराने घेणे हा जणू युगधर्मच झाला आहे. राजकीय सत्तेचा दुरुपयोग, गुंडगिरी, स्वार्थासाठी सहजपणे समाजघातक कृत्ये करणे या गोष्टी अगदी दैनंदिन झाल्या आहेत. यांतून सुटका हवी असेल तर अध्यात्माची कास धरणे क्रमप्राप्त आहे. आपला विषय आहे अध्यात्म, आरोग्य व वैद्यकशास्त्र. आपणास असे आढळून येते की मनाचे आरोग्य उत्तम असेल तर शारीरिक आरोग्याचा विचारही फार करावा लागत नाही. अत्यंत अवघड व्याधीसुद्धा सहज बऱ्या होऊ शकतात. त्यामुळे वैद्यकशास्त्र अध्यात्माखेरीज अतिशय अपूर्ण आहे हेच आपण जाणून घ्यावयाचे आहे.

 आजचे समाजाचे चित्र असे दिसत आहे की या भोगवादातून व आर्थिक हव्यासापोटी शारीरिक व मानसिक व्याधी वाढत चालल्या आहेत. ह्या भोगवादाची अतिरिक्त पातळीही श्रीमंत व विकसित राष्ट्रांमधून आयात झाली आहे. या अनुभवातून तेथील सामान्य माणूस आसने, प्राणायाम, ध्यानधारणा इकडे लागला आहे. आपण प्रत्येक गोष्टीत पाश्चात्यांची नक्कल करत असतो. अमेरिकेत भारतीय तत्त्वज्ञानाचे धडे शिकवणारे अनेक भारतीय स्वामी आहेत. डॉ. चोप्रा, डॉ. लॅरी डॉक्सी, डॉ. डीन ऑर्निश अशा अनेक नामवंत वैद्यक तज्ज्ञांनी या भारतीय तत्त्वज्ञानाचा वापर करून अनेक अशक्य विकार पूर्ण बरे केले आहेत. अर्थात त्यांचा भर आसने, प्राणायाम व ध्यानधारणा, तसेच आहार यावर मुख्यतः आहे. परंतु भारतीय तत्त्वज्ञान हा महासागर आहे. आजही त्यांची नक्कल करून आपण आसने, प्राणायाम, ध्यान- धारणा करू लागलो आहोत. 'तुझे आहे तुजपाशी' हे येथे लागू पडते. भारतातील ध्यानमंदिरे, अध्यात्ममंदिरे म्हणजे आठवड्यातून एक-दोन दिवस तेथील स्वामी यांची प्रवचने करण्याची जागा. यांतील अनेक स्वामी विद्वान आहेत, त्यांच्याजवळ रसाळ वाणी आहे. परंतु तेथे जाणारे साधक व गुरू यांत संवादाचा पूर्ण अभाव असतो. आपले सर्व तत्त्वज्ञान हे गुरुशिष्य संवादातून निर्माण झालेले आहे. हा संवादच नसेल तर साधना हे फक्त कर्मकांड होते. आपल्या ऋषि-मुनींनी कर्मकांडावर कधीच भर दिलेला नाही. गुरु कितीही श्रेष्ठ असला तरी मी माझ्यासाठी काय करणार आहे हे जास्त महत्त्वाचे ठरते. नाहीतर डीन ऑर्निश ध्यानधारणा करावयास सांगतो

५१