पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्रह्मज्ञान द्या." गुरूंनी त्याचे कुल काय? मातापित्यांचे नाव काय? असे प्रश्न विचारले. जाबाली म्हणतो, "मला माझ्या पित्याचे नाव माहीत नाही परंतु मातेला विचारून सांगतो.” घरी येऊन त्याने मातेला आपल्या पित्याचे नाव विचारले. सुरुवातीस थोडे आढेवेढे घेऊन माता म्हणते, "पुत्रा, माझा अनेक पुरुषांशी संबंध आला. तुझा पिता कोण हे सांगणे मला शक्य नाही." जाबाली परत गुरुजींकडे गेला व ही हकीकत त्यांना सांगितली. जाबालीच्या सत्यप्रियतेवर संतुष्ट होऊन गुरुजींनी त्याला 'सत्यकाम' ही पदवी दिली. गुरुजींनी त्याला शिष्यत्वही दिले. गुरुजी म्हणाले, “जाबाली, या गाई घेऊन तू वनात जा, त्यांची उत्तम देखभाल कर, व त्या दुप्पट झाल्या की परत ये. मग मी तुला ब्रह्मज्ञान देईन." जाबाली गाई घेऊन वनात गेला, अनेक वने तो हिंडला व गाई दुप्पट होताच गुरुजींकडे परत आला. गुरुजींनी विचारले की “पुत्रा, तुला अरण्याने काय शिकवले? गेल्या बारा वर्षांत तुला काय मिळाले?" जाबाली म्हणतो, “गुरुजी, अनंत वृक्षवल्ली, पक्षी, पशुगण, वनवासी जन, नद्या नाले, अशा प्रत्येक गोष्टीने मला ज्ञान दिले. रोज नवीन, नव नवीन ज्ञान यातून जीवन म्हणजे काय हे मी शिकलो. आता आपल्या आज्ञेप्रमाणे आपणाकडून ज्ञान मिळवण्यासाठी परत आलो आहे.” संतुष्ट होऊन गुरुजी म्हणाले, "बेटा, ब्रह्मज्ञान म्हणतात ते काही वेगळे नाही. आपल्या भोवतालचा विश्वाचा पसारा म्हणजेच इदं. अखिल विश्वाच्या मुळाशी एकच तत्त्व आहे. ते आत्मतत्त्व असो वा जडतत्त्व असो. ते ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आज तू खरा ब्रह्मज्ञानी झालास."

 अरण्यात जाऊन केलेली तपश्चर्या हीच अरण्यकांचे उगमस्थान. प्रत्येक ज्ञानपिपासूने हा मार्ग अवलंबला होता. गौतम बुद्धाने सुद्धा बोधिवृक्षाखाली बसून बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यातून मिळालेल्या ज्ञानामुळे तो बुद्ध झाला. असे अनेकानेकांनी थोडे थोडे ज्ञानकण वेचत वेचत अंती जे प्राप्त करून घेतले व नंतर पुढच्या पिढ्यांना दिले, ते एकत्रित ज्ञान म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञान. आज विद्याप्राप्तीची जी मंदिरे आहेत असे आपण म्हणतो त्यांचे पावित्र्य, ज्ञानसाधनेचा अखंड प्रवाह ह्या गोष्टी दूषित होत आहेत, नव्हे झाल्याच आहेत. खेद याच गोष्टीचा की आज सुधारित जगात खरी ज्ञानपिपासा क्षय पावत चालली आहे. हा काही निराशावादी सूर नाही. अशा परिस्थितीतूनही वाट काढून हिमालयाची उंची गाठणारे

५४