पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिग्गज निर्माण होत आहेतच. पण एकेकाळी या जगात शिखरस्थानी असलेली आपली जागा मात्र निश्चितपणे तळाला जाऊ लागली आहे.
ब्राह्मणकालात पोसवलेल्या यज्ञीय कर्मकांडाची प्रतिक्रिया म्हणजे उपनिषदे असे म्हटले जाते. कर्मकांड म्हणजे अशक्त, अविश्वासू नौका. त्या काय मानवाला तारून नेणार? याचा अर्थ असा की ख्रिस्तपूर्व शेकडो वर्षांपूर्वीही ज्ञानवंतांनी कर्मकांडाचा धिक्कार केला होता. आज आपण नेमके नको तेच करत आहोत. जयंत्या, पुण्यतिथ्या, राष्ट्रीय उत्सव या गोष्टी साजऱ्या करणे म्हणजे निव्वळ कर्मकांड. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर अशा थोर व्यक्तींच्या जयंत्या म्हणजे कर्मकांड, सुट्टी. त्या दिवशी फक्त मजा मारावयाची. लोकांच्या कल्याणासाठी कागदावर सुंदर सुंदर योजना आखल्या जातात, त्यासाठी अफाट खर्चही होतो परंतु प्रत्यक्षात त्यातून निष्पत्ती काय? त्याचे माप खर्चाच्या टोलेजंग आकड्यात मोजले जाते पण प्रत्यक्ष लाभाचे मोजमाप काय? प्राचीन कालखंडात कर्मकांड धिक्कारले गेले, पण अर्वाचीन युगात आपण त्यातच बुडत चाललो आहोत.

 उपनिषदांतील बराचसा भाग संवाद पद्धतीने सांगितलेला आहे. छांदोग्य उपनिषदात आरुणी व त्याचा पुत्र आणि शिष्य श्वेतकेतू, इंद्र आणि प्रजापती तसेच बृहदारण्यकातील याज्ञवल्क्य व त्याची पत्नी मैत्रेयी असे अनेक संवाद प्रसिद्ध आहेत. बुद्धीने शोध घेत घेत आपल्याला कळलेले तत्त्व सांगावे या वृत्तीतून उपनिषदांचा जन्म झाला. परंतु तार्किक पद्धतीचा अवलंब करून अंतिम सत्याचे ज्ञान होणार नाही हाही निष्कर्ष त्यांना काढावा लागला. ज्ञानप्रज्ञेने (By Intuition) ज्ञान नक्कीच प्राप्त होते परंतु मिळालेले ज्ञान सत्य आहे हे कसे ठरवावयाचे? त्याला निकष काय लावावयाचा? हा निकष म्हणजे साक्षात अनुभवाचा. हाच निकष आजही आपण लावतोच. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादीतील वैश्विक सत्ये - विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग करूनच त्यांचे ज्ञान मिळवतात. वैद्यकशास्त्रातही शरीरशास्त्र, शरीरविज्ञान प्रत्यक्ष मृत व्यक्तींची चिरफाड करूनच प्रत्यक्ष ज्ञान मिळवले जाते. आजही पुस्तके वाचून, प्राध्यापकांची लेक्चर्स ऐकून फक्त माहीती मिळते. परीक्षेत मार्कही बरे मिळू शकतात. परंतु ही माहीती म्हणजे ज्ञान नव्हे. या माहीतीला प्रत्यक्ष अनुभव व चिंतन यांची जोड दिल्याशिवाय तिचे ज्ञानात रूपांतर होत

५५