पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. उपनिषदांत ज्ञानाची महती गायिलेली आहे. ह्याचे स्वरूप बुद्धिगम्य किंवा निवेदनात्मक नाही. जीवन कृतार्थ करणारा तो अनन्यसाधारण असा अनुभव आहे. " तरति शोकमात्मविद् |" ह्या ज्ञानाने व्यक्ती शोक तरून जाते. (छां. ७-१३) याज्ञवल्क्याने जनकास सांगितले की तू आता अभय झालास. "अभयं वै जनक प्राप्तोसि " (बृ. ४.२.४).
 वैदिक कर्माहून ज्ञान श्रेष्ठ याबद्दल उपनिषदे स्पष्ट आहेत. पण विद्याही परा (श्रेष्ठ) व अपरा (कनिष्ठ) अशा प्रकारची असते. पराविद्या अक्षरब्रह्माचे ज्ञान देते. "अथ परा यया तद् अक्षरम् अधिगम्यते” (मु. १.१.५) पराविद्येने साध्य होणारे ज्ञान म्हणजे एकूण सर्व ज्ञान त्यात आलेच. "एकं विज्ञाय सर्व विज्ञातं भवति । "
उपनिषदांतील विविध विचार :
 उपनिषदे म्हणजे एका व्यक्तीने सलगपणे निर्माण केलेले वाड्मय नसून भिन्नाभिन्न काळांत, भिन्नभिन्न ऋषींना स्फुरलेले विचार व आलेले अनुभव यांचे कथन आहे. अंतिम सत्याच्या स्वरूपाविषयी निरनिराळे विचारही यांत आहेत. बृहदारण्यकात ब्रह्माविषयी नेति-नेति (बृ. २.३.६.) असा नकारार्थी सूर लावलेला आढळतो. श्वेताश्वतर उपनिषदात " त्याची शक्ती श्रेष्ठ प्रकारची आहे" (श्वे. ६.८) तर छांदोग्य उपनिषदात "आत्म्याला सर्वकर्मा, सर्वकामः सर्वगंधा सर्वरसः " (छ. ३. १४.२) अशी विशेषणे लावलेली आहेत. कठोपनिषदात त्याचे वर्णन “अशब्दम्, अस्पर्शम्, अरसम्...अगंधवत् " (क. १.३.१५) असे केलेले आहे. अशी वरवर सर्व विभिन्नता दिसत असली तरीही त्यात एकात्मता भासते. वातावरण तेच, सत्याकडे जाण्याची - पोहोचण्याची तीच तीव्र इच्छा सर्वत्र आढळते. ऋग्वेदकाली त्या कालखंडातील ऋषी गायी, घोडे, संपत्ती, सुंदर स्त्रिया यांच्या प्राप्तीसाठी देवतांना आळवीत. परंतु हे सर्व क्षणभंगूर आहे. संपत्तीमुळे अमृतत्वाची आशा करता येत नाही, ते विकत घेता येत नाही "अमृतस्य नाशाऽस्ति वित्तेन ।” (बृ. २.४.२) हाच विचार नंतर श्रेष्ठ ठरला व निश्चित झाला. आकर्षक व प्रेय अशा गोष्टी नाशवंत असतात, त्यांनी कधीच समाधान होत नाही. या कालात 'अमृतत्व प्राप्त करून घ्यावयाचे' हाच ध्यास या सर्व ऋषींना लागला होता.

 ऋग्वेदकाली देवतांची आळवणी संपत्ती व सुंदर स्त्रियांची प्राप्ती अशा

५६