पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषयोपभोगासाठी केली जात असे. नंतर या सुखांनी तृप्ती कधीच होत नाही हे ऋषींनी आवर्जून सांगितले आहे. ययातीची कहाणी प्रसिद्धच आहे. उपभोगाने कधीच तृप्ती होत नाही. उलट अग्नीमध्ये तुपाची आहुती दिल्यावर तो जसा वर उफाळून येतो तशी विषयवासनाही वाढतच जाते.

न जातुः कामः कामानामुपभोगेन शाम्यति
हविषा कृष्णवत्मेव भूय एवाभिवर्तते

 मानवी स्वभावाचा आपल्या पूर्वजांचा खूपच अभ्यास होता. मनुष्याची प्रवृत्ती सुखोपभोगाकडे असते हे नैसर्गिक आहे. पण त्याची परिमिती जाणून घेणे हे महत्त्वाचे असते. हे न ओळखणारा फक्त मानवच. प्राचीन काळी असा एक मतप्रवाह होता -

न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानाम् निवृत्तिस्तु महाफला

 मांसभक्षण, मद्यपान व लैंगिक सुख याकडे मानवाची प्रवृत्ती असते, हे सत्य असले तरी त्या प्रवृत्तीवर संपूर्ण ताबा ठेवणे, त्यापासून निवृत्ती हेच अंती समाज व व्यक्ती यांच्या हिताचे असते. हेच नीतिशास्त्र. प्रेय गोष्टीपेक्षा श्रेय गोष्टीकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य हितकर. पूर्वीच्या ऋषि-मुनींना हीच ओढ होती. सुरी शक्तीपेक्षा असुरी शक्तीच जास्त प्रबळ असतात. हे बदलण्याचा प्रयत्न करणे हेच मानवतेचे लक्षण, हेच तत्त्वज्ञानात आढळते.

 अमृतत्व कसे मिळवावे याचे सर्वसाधारण उत्तर स्वतः च्या आत्म्याच्या शोधाने व अंती त्याच्या साक्षात ज्ञानाने अथवा अंतिम सत्य जे ब्रह्म त्याच्या साक्षात ज्ञानाने. हे ज्ञान कसे मिळवावयाचे? कठोपनिषदातील नचिकेताची कथा प्रसिद्ध आहे. या कथेतील आत्म्याचे वर्णन आहे ते चिंतनीय आहे. वाजश्रवस हा एक धनवान माणूस. त्याने विश्वजित नावाचा यज्ञ आरंभला. संपत्तीचे दान केले. गाईंचे खिल्लार म्हणजेही संपत्तीच. त्याचे नावही गोधन. या गोधनाचे दान चालू असताना वाजश्रवाचा पुत्र नचिकेत हा तेथेच होता व हा समारंभ पाहत होता. त्याच्या मनात विचार आला की दान द्यावयाचे ते उत्तम गोष्टींचे. आणि पिताजी तर भाकड गाईंचे दान देत आहेत. अशा दानात काय अर्थ आहे? हा तर खोटेपणा (हल्ली खोटी नाणी देवापुढे

५७