पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपनिषदांचा मिळून सर्वसमागमी असा एकच प्रमुख विचार आहे. उपनिषदांचा कालखंड तसा दीर्घ आहे. काळ जसजसा जात गेला तसतसा पुढील चिंतकांच्या विचारांना प्रौढपणा येत गेला. आपण म्हणतो की मागील पिढीच्या खांद्यावर बसून नवी पिढी जगाकडे बघत असते. ओघानेच त्याचे क्षितिज विस्तारत जाते. यामुळे मागील पिढी जेथे संपते तेथून नव्या पिढीची वाटचाल चालू होते. हाच नियम गीतेला लावता येईल. विविध दार्शनिक विचारांना प्रौढावस्था प्राप्त झाल्यावर त्याचे सूत्ररूपाने निबंधन झाले तो काळ म्हणजे सूत्रकाल. ख्रिस्तीशकाचे दुसरे ते सहावे शतक हा तो काळ मानला जातो. प्रमुख उपनिषदांच्या रचना पूर्ण झाल्यानंतर ते सूत्रकाल सुरू होईपर्यंत सुमारे आठशे वर्षांचा कालखंड गेला होता. या अवधीत भारतात जीवनविषयक विचारांचे खूपच मंथन झाले होते. बौद्धांची नैतिक आणि धार्मिक क्रांती याच कालखंडात झाली. भगवद्गीतेचा रचनाकाल हाच आहे. निरनिराळ्या जीवननिष्ठांचे प्रवचन गीतेत आहे. ह्या सर्व निष्ठांमध्ये दर्शनी फरक वाटत असला तरी तसे बिलकुल नाही असे गीताच सांगते. या सर्व निष्ठांमध्ये एकसूत्रता आहे, सर्व निष्ठांचा समन्वय साधला जात असतो हे गीतेत स्पष्ट आहे. "अविभक्तं विभक्तेषु" हा गीतोपदेश आपणा भारतीयांमध्ये मुळातच आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने समन्वयवादी आहोत. आजचे 'सर्वधर्मसमभाव' हे वचन ह्या गीतेतील उपदेशातीलच रूप आहे. येथे हिंदू, मुसलमान, जैन, बौद्ध, शीख असे धर्म गृहीत नसून त्या त्या समाजाची ती जीवननिष्ठा असा अर्थ घेतला जावा. या सर्व जीवननिष्ठांचा समन्वय म्हणजेच आजचा 'सर्वधर्म समभाव' हा नवघटक.

 आपण असे गृहीत धरतो की श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर केलेला उपदेश म्हणजे गीता. श्रीकृष्णाला योगेश्वर श्रीकृष्ण असेही आपण म्हणतो. योग म्हणजे जोडणे - आत्म्याची परमात्म्याशी गाठ जोडून देणे. गीतेचे अठरा अध्याय म्हणजे अठरा योग आहेत. विषादयोग, सांख्ययोग इत्यादी. आपल्याकडे वेदकालापासून जे जे ग्रंथभांडार उपलब्ध आहे, त्या त्या प्रत्येक ग्रंथावर पुढील काळातील विद्वानांनी संशोधन केले आहे. उपनिषदे, रामायण, महाभारत, पातंजल योगसूत्रे अशा ग्रंथांचा त्यात समावेश आहे. यांत अनेक पाश्चात्य विद्वानांचाही समावेश आहे. महाभारत या ग्रंथाचे मूळ श्लोक फक्त पंचवीस हजार होते. त्यात पुढील लेखकांनी भर घातली.

६४