पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी भर पडत पडत तो ग्रंथ पंचाहत्तर हजार श्लोकांचा तयार झाला. अशी भर सूतकालातही पडलेली आहे. हीच गोष्ट रामायणाची. नंतर जोडलेले प्रक्षिप्त भाग आहेत.

भीष्मपर्वाचे २३ ते ४० अध्याय म्हणजे महाभारतात आलेली गीता. हा म्हणजे महाभारतातील कथाभागातील वाङ्मयीन संदर्भ. त्याला कुरुक्षेत्रावरील युद्धाचा पाया दिला आहे. अर्जुन हा पांडवांचा सर्वश्रेष्ठ योद्धा. तो रणांगणावर रथातून येतो व त्याला दिसते की समोर शत्रू म्हणून उभे आहेत त्यांत आपले काका, मामा, आचार्य, आजे, पुत्र, पौत्र व मित्र हेच आहेत. हे तर आपले प्रियजन. त्यांना मारावयाचे? त्यापेक्षा नको ते राज्य. "मी युद्ध करणार नाही." असे म्हणून तो धनुष्यबाण खाली टाकून बसला. श्रीकृष्णाने त्याला उपदेश करून युद्धाला प्रवृत्त केले. शेवटी तो श्रीकृष्णाला म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी युद्ध करतो.' (करिष्ये वचनं तव ।)

 पण ही गीतेची केवळ वाङ्मयीन चौकट आहे. नाहीतर भर रणांगणात अठरा अध्याय भरणारी गहन गंभीर चर्चा शक्यच नाही. सत्य असे आहे - गीतेच्या ग्रंथकाराने ही चौकट अतिशय विद्वत्तापूर्ण प्रकाराने निर्माण केली आहे. गीतानिर्मितिकालापर्यंत भारतात शेकडो वर्षे जीवनविषयक विविधांगी चिंतन झाले होते. पण ते मोठ्या प्रमाणात विखुरलेले होते. हे ज्ञानभांडार कोणीतरी समर्थ लेखकाने एकत्रित करून गीतेची निर्मिती केली. त्यावर इतरही अनेक लेखकांनी संस्करणे केल्यावर तिला अंतिम स्वरूप मिळाले. आणि या धनाची स्थापना महाभारतात करण्यात आली. यामुळे संशोधकांनी मिमांसेने सांगितलेले निकष याला न लावणे हेच योग्य होईल. भगवान श्रीकृष्ण एवढा थोर होता की त्या काळात असा आदर्श पुरुष सापडणे कठीण.तेव्हा गीतेला महाभारतातील स्थान हे

प्रतीकात्मक आहे असेच म्हणावे लागेल.मूळ महाभारतात कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला एवढाच उल्लेख आहे. अर्जुनाच्या विषादाचे कारण फारच छोटे होते.'मी युद्ध करावे की न करावे', हा तो प्रश्न. पहिल्या अध्यायात - विषादयोगात कुलक्षय, कुलधर्म, जातिधर्म, वर्णसंकर इत्यादी प्रश्न अर्जुनाने निर्माण केले आहेत.पहिला अध्याय सोडला तर या प्रश्नाव्यतिरिक्तच परंतु जीवनविषयक तत्त्वज्ञानाचीच पुढे चर्चा आहे. एकूण गीता ही भारतीय तत्त्वज्ञानाचे साररूप स्वरूप आहे आणि ते

६५