पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (१) सत्त्वगुण : ज्ञानपिपासू, विद्यालोभी, सदाचरणी असा हा निर्विकार व निर्मळ असतो. त्याचे फल अंतिम सुख, ज्ञानप्राप्ती व वैराग्य.
 (२) रजोगुण : लोभी, चंचल, उपभोगाची आसक्ती, अतिदुःख हे फल. •
 (३) तमोगुण : कर्तव्याचा विसर, हव्यास, अज्ञान व पापवृत्ती, अतिदुःख,व्याधी हे फल.
 हे सर्व गीतेत दिले आहे. (सविस्तर पाहा - 'आहार एक यज्ञकर्म') हठयोग- प्रदीपिका, घेरंडसंहिता, शिवसंहिता या योगांच्या पुस्तकांतही साधकाचा आहार कसा असावा हे दिले आहे. आहारसुद्धा त्रिगुणी आहे. सात्त्विक आहार मनुष्याला सात्त्विक बनवितो, राजस आहार रजोगुणी व तामस आहार तामसी बनवितो. सारांशाने आहार हा मनही घडवतो हे आपल्या ऋषि-मुनींनी हजारो वर्षे पूर्वीच जाणले होते. ही संशोधनाची गंगा पुढे वाहती राहिली नाही. त्याची कारणे काहीही असोत. आपण आज फक्त पूर्वजांची यशोगाथा गात असतो. इतिहास आपण अभिमानाने सांगतो पण आपण इतिहास मात्र घडवू शकत नाही.
 आजही आपल्याकडे आधुनिक विद्वान आहार व मन यांचा काहीही संबंध नाही असे सांगतात. पण पाश्चात्यांना याचा अनुभव आला असून त्यांच्या आहारात हळूहळू का होईना पण बदल घडत आहे. डॉ. शोएन्थॅलर यांनी मनाची प्रवृत्ती गुन्हेगारीकडे वळण्यास अमेरिकेतील निःसत्त्व अन्नाचा (Junk Food) फार मोठा वाटा असतो हे सिद्ध केलेले आहे. सुयोग्य अन्नाने गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा बदलून गुन्हेगार सात्त्विक वृत्तीचे होऊ शकतात. ब्रिटनमध्ये ग्वायलिन रॉबर्टस् यांना मुलांचा आहार सुधारला तर त्यांचे लक्ष शिक्षणावर जास्त केंद्रित होते व ती ज्ञानपिपासू बनतात असा अनुभव आला. डॉ. वर्टमन यांनी असे सिद्ध केले की पोषक घटक (Nutrients) हे अन्नातून किंवा शुद्ध स्वरूपात घेतले तर मेंदूच्या निरनिराळ्या भागात रासायनिक बदल होऊन त्यांची कार्यशक्ती सुधारते. आज मानसशास्त्रात अफाट प्रगती झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगाचे मानसशास्त्र निर्माण झाले आहे. निरनिराळ्या मानसरोगांस मेंदूतील रासायनिक बदल कारणीभूत असतात

हे ज्ञात आहे. परंतु औषधांनी उपचार हा फार छोटा भाग ठरावा.आहार,जीवनशैली, दैनंदिनी हे घटक तितकेच महत्त्वाचे. आज मुंबईसारख्या प्रचंड शहरांत

६८