पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भय वाटले. परंतु आपणाखेरीज जगात दुसरे कोणी नाही त्यामुळे भय वाटण्याचे कारण नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तो निर्भय झाला. द्वैतापासून भीती उत्पन्न होते (छां. ७.४.२). आपला आत्मा कोण आहे, याचे ज्यास ज्ञान झाले आहे त्याची सर्व भीती नाहीशी होते. कारण आत्मज्ञान म्हणजे आपणाखेरीज भय उत्पन्न करील असा कोणीही नाही याचे ज्ञान.
उपनिषदांनी या आधिभौतिक प्रकारात अनेक गोष्टींची चर्चा केलेली आहे. त्याची तोंडओळख आपणास करून घ्यावयाची आहे, सखोल अभ्यास नाही. या प्रकारात संकल्पाचे श्रेष्ठत्व, चित्ताचे श्रेष्ठत्व, मनोवृत्तीचे वर्गीकरण असे अनेक भाग आलेले आहेत. वेगळ्या स्वरूपात हेच विवरण गीतेतही सापडते. तेव्हा आता विकृत मानसशास्त्र अथवा मनोविश्लेषण यावर थोडी दृष्टी टाकूया.
 विकृत मानसशास्त्र किंवा मनोविश्लेषण :
 असे दिसते की, मनुष्याच्या इहलोकातील आयुष्यासंबंधी चर्चा करून त्यातून समाधान न मिळाल्यामुळे, देहावसानानंतर आत्मा कोठे जातो, परलोकी आत्म्याचेकाय होते या प्रश्नांचीच जास्त चर्चा झालेली आले. मानवी जीवनाचे मूळ कोणते हा प्रश्न वारंवार विचारण्यात आला आहे. “वृक्ष तोडला तरी मुळे जिवंत आहेत तोपर्यंत तो पुन्हा वाढतो. पण मृत्युरूपी लाकुडतोड्याने मानवाचा जीवनवृक्ष तोडल्यावर तो पुन्हा (वेगळ्या रूपात) जोमाने वाढतो. मग त्याचे मूळ कोठे असावे?” (बृ. ३.९.२८) उपनिषत्काली परलोकज्ञान हेच श्रेष्ठ ज्ञान समजले जाई. त्यामुळे विद्वान माणसाला मृत्यूनंतर काय होते हे माहीत असावयासच पाहिजे ही धारणा.
कठोपनिषदातील मृत्युचर्चा :
 नचिकेता आणि यमधर्म यांचा जो संवाद झाला त्यात परलोकज्ञान श्रेयस्कर असे म्हटले आहे. इतर अनेक वर देण्यास यमधर्म तयार असूनही नचिकेता आत्मज्ञानावर हठून बसला होता (क. १.१.२०-२९). या चर्चेत आपण काही खोलवर जाणार नाही. पण नचिकेताला यमधर्मापासून आत्मज्ञान मिळाले. हेच

तत्त्व गीतेमध्ये सांगितले आहे. मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून जसे नवे वस्त्र धारण करतो,

७०