पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घरट्यातून निघून बाहेर भ्रमण करतो. मात्र प्राणवायूच्या साहाय्याने आपल्या घरट्याचे रक्षण करतो. हा देव इतस्ततः संचार करत अनेक रूपे निर्माण करतो. सुंदर स्त्रियांशी रममाण होतो, किंवा चांगले खाद्यपदार्थ खात राहतो, किंवा भयानक देखावे पाहतो (बृ. ४.३.९-१८). 'स्वप्न सुषुप्ती' म्हणजे जाणीव व नेणीव या दोहोंमधील अवस्था होय. या पुरुषाच्या दोन अवस्था आहेत. एक इहलोकातील व दुसरी परलोकातील. या दोन अवस्थांमधील अवस्था म्हणजे 'स्वप्नसुषुप्ती' या अवस्थेत आत्म्याचे ठिकाणी विलक्षण निर्माणशक्ती निर्माण होते असे म्हटलेले आहे. शेवटी स्वप्न म्हणजे जागृतीची प्रतिकृती असली, तरी या अवस्थेत आत्मा प्रत्यक्षात काहीही नसलेल्या गोष्टी निर्माण करतो. या गोष्टी भासमान असतात. तरीही त्या सत्य वाटतात.
 आपल्या आजच्या आधुनिक भाषेत असे म्हणता येईल की -
 (१) गाढ निद्रेमध्ये मनुष्य केवळ श्वास घेतो म्हणून त्याला जिवंत म्हणावयाचे. ज्याला इंग्रजीत (sleeping like a log) एखाद्या ओंडक्यासारखी स्थिती असणारी निद्रा ही एक अवस्था.
 (२) दुसरी स्थिती म्हणजे पूर्ण जागृती. इहलोकातील जीवन.
 (३) या दोन अवस्थांच्या मध्ये असणारी स्थिती म्हणजे स्वप्नावस्था.
 स्वप्नांचा अन्वयार्थ लावण्याचा, त्याचा शुभ-अशुभाशी संबंध जोडण्यावर आपल्याकडे अनेकांचा कल होता. या लोकांनी त्यावर अनेक ग्रंथही लिहिले आहेत. परंतु विसाव्या शतकात, त्यातील उत्तरार्धात सुद्धा यावर ग्रंथनिर्मिती झालेली आढळते. आपल्याकडे ‘स्वप्नचिंतामणी', 'स्वप्ने भविष्य सांगतात' अशी पुस्तके सहज आढळतात. तर अमेरिकेत खूप विक्री झालेले 'दहा हजार स्वप्नांचा अन्वयार्थ' (Ten Thousand Dreams Analysed) हा ग्रंथ म्हणजे काही नमुने. होमिओपॅथीत 'स्वप्ने' ही काही शारीरिक विकृतींची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यानुसार लक्षणकोशात औषधेही सांगितलेली आहेत.
मानसशास्त्रातील संशोधन :

 उपनिषत्कालीन तत्त्ववेत्त्यांनीही स्वप्न व सुषुप्ती या अवस्थांचा ऊहापोह केला.

७२