पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांनी भूतबाधा, मृतांशी संभाषण अशा गोष्टीतील चित्तभ्रमाचाही विचार केलेला आहे. उपनिषदात (बृहदारण्यक ) एके ठिकाणी असे सांगितले आहे की, लाह्यायनाचा पुत्र भुज्यू हा विद्यार्थिदशेत एकदा मद्रदेशात गेला. तेथे त्याने कपीचा पुत्र पतंजल याचे घरी मुक्काम केला. पतंजलाच्या मुलीचे अंगी एका गंधर्वाने प्रवेश केला असल्यामुळे तिला परलोकवासी जीवांशी संभाषण करता येत असे. भुज्यूने त्या गंधर्वास “तू कोण आहेस?" असे विचारले असता त्याने " मी अंगिरसाचा पुत्र सुधन्वा आहे” असे उत्तर दिले. ते ऐकून भुज्यूने त्याला आणखी दोन प्रश्न विचारले. एक परलोकाच्या विस्तारासंबंधाने व दुसरा परीक्षिताचे पुत्र कोठे आहेत? भुज्यूने विचारलेल्या या प्रश्नांचे उत्तर उपनिषदात आढळत नाही. नाहीतर संशोधकांनी त्यावरही विचार केला असता. याचा एकच अर्थ की भुज्यू हा गूढज्ञानवादी असून त्या विषयाचा अभ्यासू होता एवढेच आपल्या ध्यानी येते.
 हा गूढवाद हजारो वर्षांपूर्वी त्या ऋषींना सुचला, त्यासंबंधी ज्ञान मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याला अस्तित्वच नाही असे अनेक लोक आज समजतात. हा गूढ आहे (Misticism) म्हणजे अंधश्रद्धेचाच एक प्रकार असे म्हणणारे अनेक लोक आहेत. पण पाश्चात्यांनी सुद्धा 'परामानसशास्त्र' (Para Psychology) हे शास्त्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. आल्बट फ्रेहरर हे परामानस- शास्त्राचे संस्थापक मानले जातात. पुनर्जन्म आहे का? मागील जन्माच्या आठवणी पुढील जन्मी राहू शकतात का? आत्म्याशी संबंध जोडता येतो का? असे प्रश्न पाश्चात्य शास्त्रज्ञांनाही पडले होते. डॉ. बेलिने, डॉ. नस्टीन वगैरेंनी केलेल्या प्रयोगांवरून 'जाणीव' हीसुद्धा ऊर्जाच आहे हे त्यांना उमगले. ती जर त्या विश्वात पाठवता आली तर त्या जगातील जाणीव येथे बोलावून घेता येणे शक्य आहे. तसे जर साध्य झाले तर माणसाला भूतकाळ व भविष्यकाळ सहज जाणून घेता येईल. 'जाणीव' हा ऊर्जाप्रकार कालातीत आहे व तो मृत्यूनंतरही उरत असावा, अशी तत्त्ववेत्त्यांची धारणा आहे.

 आपल्याकडे 'परामानस' शास्त्र हा शिक्का मारलेले स्वतंत्र शास्त्र नसले तरी योगशास्त्राचा तो एक भाग आहे. ज्यांनी अफाट सिद्धी मिळवल्या त्यांना सिद्धपुरुष म्हटले जाते. असे अनेक सिद्धपुरुष आपल्याकडे होऊन गेले. परंतु तत्त्वज्ञानाप्रमाणे

७३