पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिद्धी ही दुय्यम व 'कैवल्य' हे श्रेष्ठ असे मानले गेलेले आहे. भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय म्हणजे योग. ज्यांना इतर योगसाधना जमत नाही ते भक्तियोगानेही कैवल्य प्राप्त करून घेऊ शकतात.
 आधुनिक कालखंडात सर एकल्स हे 'नोबेल' पारितोषिकाने सन्मानित झालेले गृहस्थ. त्यांनी ही गीतेतील पुनर्जन्माची कल्पना शास्त्रीय भाषेत सविस्तरपणे मांडलेली आहे. ते आपल्या 'Body and Mind The Many Faceted Problems ' या पुस्तकात जाणीव (Consciousness) या ऊर्जेचे अनेक पैलू उलगडून सांगतात. या पुस्तकात 'जीवन आणि मृत्यू' यावर अनेक विचारवंतांचे लेख आहेत. हे मुळात अभ्यासण्याजोगे आहे. (ही चर्चा माझ्या 'मागोवा आरोग्याचा' ह्या पुस्तकाच्या माझ्या मनोगतात मी साररूपाने केली आहे). अशा अनेक पुस्तकांचे वाचन करून चिंतन केल्यावर काढलेला नित्कर्ष असा, “हे विश्व ही ऊर्जा आहे व त्याला तत्त्वज्ञानात आदिशक्ती असे म्हटले आहे. यातील प्रत्येक गोष्ट, मग ती अचल वा चल असो, म्हणजे ह्या आदिशक्तीचा 'अणू' - अंश आहे. त्या आदिशक्तीमधूनच तो जन्म घेतो, रूप घेतो, मन घेतो व मृत्यूनंतर तिच्यातच विलीन होतो. आत्मा व ब्रह्म हे एकच आहेत व ती ऊर्जा आहे. ही संकल्पना जन्म आणि मृत्यू या समस्येचे उत्तर असू शकते.
विचारशक्तीचा प्रभाव :

 अर्वाचीन मानसशास्त्रात ज्याला 'विचारशक्तीचा प्रभाव' असे म्हटले गेले आहे, त्याचे महत्त्व किती हे उपनिषदांत अनेक ठिकाणी चर्चेत आलेले आहे. त्यातील अनेक गोष्टी आजच्या युगात थोड्या चमत्कारिक वाटतात. परंतु काही सत्य, सहज पटणाच्या आहेत. फक्त एक सतत ध्यानात ठेवावयास पाहिजे की त्या काळातील भाषा प्राचीन व आर्ष होती. त्यामुळे त्यातील हार्द समजावून घेऊन त्यावर चिंतन करावे लागते. अनेक शब्दांचे अर्थ कालानुसार बदलत असतात, हे तर आपण जाणतोच. “जो चतुष्कल ब्रह्मपदाचे प्रकाशमान म्हणून ध्यान करतो तो या लोकी प्रकाशमान होतो’”, “जो तेजच ब्रह्म आहे, अशी उपासना करतो तो लोकी तेजस्वी होतो", "ब्रह्म प्रतिष्ठा आहे असे समजून जो त्याची उपासना करतो तो प्रतिष्ठावान होतो”, “ब्रह्माची जो असत् म्हणून उपासना करतो तो नष्ट होतो, पण ते सत्

७४