पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. परंतु आध्यात्मिक मानसशास्त्राचाच तो भाग आहे.
 (३) जीवात्म्याच्या अवस्था :
 जागृती, स्वप्न, सुषुप्ती व स्वसंवेद्य अशा जीवात्म्याच्या चार अवस्था आहेत. त्यांना वैश्वानर, तैजस, प्राज्ञ आणि आत्मा अशी नावे दिलेली आहेत. वेदान्त- शास्त्रात ही कल्पना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. ह्या चार पाद अथवा अवस्थांपैकी पहिली 'जागृती', तिला 'वैश्वानर' असे म्हटले गेले आहे. दुसरी अवस्था म्हणजे स्वप्नावस्था, या अवस्थेत आत्म्यास सूक्ष्म वस्तूंचे ज्ञान होते व त्यांचा तो उपभोग घेतो, तेव्हा त्याला 'तेजस' असे म्हणतात. पूर्ण निद्रेमध्ये मनुष्यास कोणतीच इच्छा होत नाही, तो पूर्णपणे सर्व भावनांपासून मुक्त असतो, या अवस्थेस - सुषुप्ती' असे म्हणतात. या स्थितीत आत्मा स्वकेंद्रस्थ, विज्ञानघन व आनंदमय असून तो आनंदाचा उपभोग घेत असतो. या वेळी त्याला 'प्राज्ञ' असे म्हणतात चौथी अवस्था म्हणजे 'स्वसंवेद्य' (Self-conscious) किंवा स्वयंप्रज्ञ म्हणावे असे गुरुदेव रानड्यांनी लिहून ठेवले आहे. त्या अवस्थेत आत्मा जाणीव-नेणिवेच्या पलीकडे असतो, असे मनोव्यापाराचे वर्गीकरण केले गेलेले आहे. ह्या झाल्या जीवात्म्याच्या अवस्था. हे आपल्याला मांडुक्योपनिषदात आढळते म्हणूनच हे उपनिषद अर्वाचीन आहे असे म्हटले गेले आहे.
पिंड - ब्रह्मांड विचार :

 जीवात्म्याच्या चार अवस्था म्हणजे वैश्वानर, तैजस, प्राज्ञ व आत्मा हे आपण पाहिले. ही कल्पना वेदान्तशास्त्रात फार महत्त्वाची मानण्यात आली आहे. जीवात्म्याच्या अवस्थांप्रमाणे विश्वात्म्याच्याही चार अवस्था असल्याचे मांडुक्योपनिषदात म्हटले आहे. या चार अवस्थांना विराज, हिरण्यगर्भ, ईश व ब्रह्मन् अशी नावे देण्यात आली आहेत. पिंडाच्या चार अवस्थांनुसार ब्रह्मांडाच्याही चार अवस्था विश्वात्म्यास पूर्णपणे लागू पडतात. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी अशी संकल्पना उपनिषदांत सुस्पष्टपणे मांडलेली दिसत नाही. परंतु पिंड हे लहानसे ब्रह्मांड असून ब्रह्मांड म्हणजे पिंडाची अतिवाढलेली आवृत्ती आहे असे दिसते. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे एक आरसा असून त्यात विश्व प्रतिबिंबित झालेले असते असे उपनिषदात म्हटले आहे. 'लायब्नीझ' याने असे प्रतिपादन केले आहे

७६