पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की, "जड वस्तूचा प्रत्येक परमाणू म्हणजे एक विश्व असून त्यात सर्व सजीव प्राणी, निर्जीव पदार्थ, बुद्ध्यहंकार (Entelechy) व आत्मा भरलेला आहे. प्रत्येक परमाणू म्हणजे मत्स्यांनी भरलेले एक डबकेच होय."
 आधुनिक विज्ञानाप्रमाणेही प्रत्येक वस्तू, प्रत्येक सजीव प्राणी या विश्वातील काही मूलभूत घटकांचा बनलेला आहे. मुंगीपासून प्रचंड हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याच्या देहरचना, कार्य व रचनेचे मूलभूत घटक यांचे पूर्णज्ञान आज विज्ञानामुळे आपणासं झाले आहे. तेव्हा उपनिषद्कारांचा 'पिंडी ते ब्रह्मांडी' हा सिद्धान्त सत्यच आहे. आज मृत्यूनंतर सजीव प्राण्याचे काय होते हा वैज्ञानिक प्रश्न उद्भवत नाही. कारण त्याचे विघटन होऊन नंतर त्या घटकांचे भूलभूत घटकांत रूपांतर होत असते. जन्म आणि मृत्यू यांचे हे चक्र अखंड चालू असते. विज्ञानाला ज्ञात नाही ते मनुष्य मरतो म्हणजे त्याच्या देहातील कोणती शक्ती नाश पावते. मृत्यूनंतर हृदय बंद पडते, मेंदूचे कार्यही पूर्ण थंडावते. पण हे का? ह्याचे उत्तर मात्र आधुनिक विज्ञानात नाही. हे कारण अध्यात्म सांगते- शिकवते. उपनिषदांनी याचा ऊहापोह करून “सर्व भूते ज्यापासून निर्माण होतात, ज्यामुळे ती जिवंत राहतात व शेवटी ज्यात ती लीन होतात ते ब्रह्म" असा काढलेला निष्कर्ष बुद्धीला सहज पटावा. साहजिकच पुनर्जन्माची कल्पनाही वेगळ्या अर्थाने मान्य होण्यास हरकत नसावी. आज 'रामचंद्र विनायक' अशा काहीतरी नावाने ओळखला जाणारा देह उद्या तोच परत जन्मास येणार नाही. त्याचे रूप, देह हे सर्व नवीनच असेल आणि तोच त्याचा पुनर्जन्म. "पुनरपि जननं पुनरपि मरणं" हे सत्य आहे. गीतेनेही हेच सुस्पष्ट शब्दांत सांगितलेले आहे. पुनर्जन्माची कल्पना फक्त काही उपनिषद्कारांचीच नाही. ऋग्वेदातील प्रथम मंडलात हीच कल्पना सांगितलेली आहे.
सारांश :
 भारतीय तत्त्वज्ञानाच्या काही काही भागांचा आपण जो आढावा घेतला, त्यात अर्थातच 'आयुर्वेद' - उपवेद म्हणून, 'पातंजल योग', 'हठयोग' वगैरे गोष्टी घेतलेल्या नाहीत. कारण माझ्या पूर्वीच्या सर्व पुस्तकांत त्यांचा वापर त्या त्या विषयानुसार केलेला आहे. (१) मागोवा आरोग्याचा, (२) आहार - एक यज्ञकर्म, (३) मागोवा आरोग्याचा सुधारित व विस्तारित - दुसरी आवृत्ती, (४) हृदय-- 199