पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोडून ही साखळी तयार होते. त्यांतील एक दुवा जरी गळला तरी ती एकसंध साखळी न राहता तिचे तुकडे हाती येतात, आणि काही वेळा तर या अशा तुकड्यांनाच आपण निरनिराळ्या साखळ्यांचे रूप देतो. मनाचा विचार करताना फक्त त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करून या उणीवांचे कधीच समाधानकारक उत्तर मिळत नाही. यासाठी वेगळा मार्ग अनुसरावा लागतो. मन हे अस्थिर आहे, त्याचे अस्तित्व सर्वत्र आढळते. ते फक्त मेंदूत नाही तर ते सर्वत्र शरीरात वसलेले आहे. तसेच ते विश्वव्यापीही आहे. त्याला काळ व स्थान यांचे बंधन नाही. याचे विज्ञानमार्गे संशोधनात्मक निष्कर्ष अपुरे पडतात म्हणून अध्यात्माकडे वळावे लागते. उपनिषदांत याची बरीच चर्चा आहे म्हणून त्यांचा आढावा आपण घेतला.
 असे म्हटले जाते की मन, चित्त व आत्मा ह्या अगदी स्वतंत्र गोष्टी आहेत. मन ही खिडकी आहे, त्यावाटे आपण ज्ञान मिळवत असतो व ते चित्तात साठवले जाते. आत्म्यासंबंधी उपनिषदांत जी माहीती मिळते, त्यातून पूर्ण विवरण होते असे दिसत नाही. नचिकेताला यमधर्माने दिलेले ज्ञान, जाबालीला, अरण्यवासात मिळालेले ब्रह्मज्ञान, ह्यांचे विवरण मन, चित्त व आत्मा एकच आहेत का स्वतंत्र आहेत, का जी आदिशक्ती ब्रह्मांड व्यापून उरली आहे व जी अंशरूपाने प्रत्येकात आहे, त्या चेतनेचेच एक एक रूप आहे? याला काही प्रमाणात उपनिषदांतच उत्तर मिळते असे म्हणता येईल. पाश्चात्य विचारवंतांनी तर आपण आत्म्याचे जे वर्णन पाहिले तेच वर्णन मनालाही लावले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मन हे ब्रह्मांड व्यापून राहिले आहे. त्याच्या शक्तीनेच अत्यंत गंभीर विकारही बरे होऊ शकतात, जीवनाचा अर्थ समजतो व निरामय जीवन प्राप्त होते. ह्याची चर्चा पुढे आपण करणारच आहोत.
 मनाचा आणि आहाराचा अत्यंत निकट संबंध आहे हेही ध्यानात घ्यावयास पाहिजे. छांदोग्य उपनिषदात आरुणी मुनींनी आपला पुत्र व शिष्य श्वेतकेतू याला अन्न या घटकाविषयी सविस्तरपणे ज्ञान दिले आहे. ते म्हणतात की अन्न या घटकाचा बाह्यभाग मलरूपाने बाहेर टाकला जातो. मध्यभागाचे मांस, रक्त यामध्ये रूपांतर होते व अंतर्भाग मन घडवतो. अन्न म्हणजे ऊर्जा, ती ज्या पदार्थापासून मिळते त्याचा नको असलेला भाग बाहेर टाकला जातो, क्षार व सूक्ष्म पोषक घटक देह घडवत असतात व अन्न मनही घडवते. ह्या गोष्टी विज्ञानाधिष्ठित आहेत. आत्माही

८०