पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुरूप असे स्वरूप जाणून घेणे, स्वहित व समाजहित साधण्यासाठी त्या सत्य तत्त्वांचा आधुनिक विज्ञानाधिष्ठित तत्त्वांशी संगम करणे, हाच आजच्या काळी 'युगधर्म' आहे. हा मनापासून स्वीकारणे हीच आजची आपली गरज आहे. आजच्या आपल्या काय उणीवा आहेत, त्या विज्ञानामधून का पूर्ण होत नाहीत व आपल्या एकूण 'निरामय' जीवनासाठी युक्त श्रेय काय याचे चिंतन करून, सत्य जाणून घेऊन, त्यानुसार जीवनशैली आखणे ही आपली खरी गरज आहे. तत्त्वज्ञानातील चर्चा त्या भाषेला अनुरूपच असणार व ती आजची गरज आपण आपल्या भाषेत समजावून घेऊ या.
 मनुष्य शरीर, मन व बुद्धी या तीन गोष्टी घेऊनच जन्माला येतो. त्याचे शरीर प्रत्यक्ष कार्य करत असते व ते करण्याचा निर्णय त्याने कार्य सुरू करण्यापूर्वी घेतलेला असतो. म्हणजे शरीर, मन व बुद्धीचे अस्तित्व तो पूर्णपणे जाणतो कारण ते त्याच्या अस्तित्वाच असते. हे जे मनुष्याचे देहरूपाने अस्तित्व असते, ते अस्तित्व उत्पत्ती, स्थिती व विलय या त्रयीचाच एक भाग. पण आपण जणू अमरपणाचा पट्टा घेऊन जन्माला आलो आहोत, हे जीवन माझे आहे, अनेक भौतिक वस्तूंचा मी मालक आहे असा अहंभाव त्याचे ठायी असतो. 'मी कोण ? माझे-माझे म्हणजे कोणाचे?' हा विचार ज्या क्षणी त्याच्या मनात येतो तेथूनच 'अध्यात्मा' ची सुरुवात होते. जीव म्हटला की तो पंचमहाभूतांचा घडलेला आहे, तो त्रिगुणी आहे म्हणजे पंचमहाभूते व त्रिगुण अशा आठ घटकांतून सर्व विश्व तयार झालेले आहे. प्रत्येक जीव म्हणजे या आठ घटकांचे तयार झालेले सूक्ष्म स्वरूप. मन म्हणजे सत्त्वांशापासून निर्माण झालेला एक घटक. हे सत्त्व अंशयुक्त असते. मन इंद्रियांना प्रेरणा देते. मागे आपण पाहिले आहे की कठोपनिषदात याचे वर्णन आहे. "जीवात्मा हा शरीररूपी रथातून प्रवास करतो, इंद्रिये हे घोडे व बुद्धी हा सारथी व मन हा लगाम आहे."
,   मन' ह्या घटकाचा तत्त्वज्ञानात जो विचार केला गेला आहे तो असा -

 विश्वाचा विचार स्थूल, सूक्ष्म व अव्यक्त अशा स्तरांवर करावा लागतो. त्या स्तरांना दिली गेलेली नावे अशी - (१) अधिभूत, (२) अध्यात्म, (३) अधिदैव. यापासूनच आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक अशी विशेषणे झाली. गीता (अ. ८ / १ - २ - ३ ) याबाबत असे सांगते -

८२