पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१) अक्षर अशा परब्रह्माचा स्वभाव म्हणजे 'अध्यात्म'. (२) नश्वर - नाश पावणारे असे पदार्थ म्हणजे 'अधिभूत'. (३) जीव म्हणजे 'अधिदैव'. याचाच आपल्या जीवनाशी संबंधित अर्थ असा - (१) आपल्या स्थूल शरीराशी संबंधित ते सर्व अधिभूत; (२) जीवाशी - म्हणजे अव्यक्ताशी संबंधित आहे ते अधिदैव; (३) मन व बुद्धीशी निगडीत आहे ते अध्यात्म.

आपल्या शरीरात पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये आहेत. ही स्थूल रूपातच आपल्याला प्रत्ययास येतात. इंद्रियांना 'करण' म्हणजे साधन असे म्हटले गेले आहे. त्यामुळे कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही जीवाची साधने आहेत. तसेच न दिसणारे पण ज्याची जाणीव सहज होते असे 'कारण' म्हणजे मन. म्हणून याला अंतःकरण असे म्हटले गेले आहे. मनाचा विचार करताना आपल्या ऋषींनी मनाचे सूक्ष्म विभाग पाडलेले आहेत. मूळ अंतःकरण (मन) हे सत्त्वयुक्त म्हणजेच सात्त्विक असते. लहान बालके किती निरागस असतात असे आपण म्हणतो. हीच मूळ सत्त्वयुक्त अवस्था असे म्हणता येईल. त्यात नंतर संकल्प व विकल्प हे येत जात राहतात. मूळ सात्त्विक अंतःकरणात निर्विकल्पता हा एक सूक्ष भाग आहे. हिचा प्रत्यक्ष प्रत्यय येणे ही अतिअवघड गोष्ट आहे. त्यासाठी प्रदीर्घ तपश्चर्येची जरुरी असते. पुढे आपण पातंजल योगसूत्रांतील सविकल्प समाधी व निर्विकल्प समाधीची चर्चा करू, त्यात हे प्रत्यक्ष प्रतिबिंबित झालेले दिसेल. पण मन म्हणजे 'भाव- भावना' अशी आपली कल्पना असते. या सूक्ष्म विभागात संकल्प व विकल्प येत राहतात. संकल्प-विकल्पानंतरच निर्णय घेतला जातो हा सूक्ष्म विभाग म्हणजेच बुद्धी. हिची जाण व प्रत्यय आपणा सर्वांनाच येतो. आपण चिंतन करतो तो सूक्ष्म भाग चित्त या नावाने ओळखला जातो. आणखी एक सूक्ष्म भाग म्हणजे ' अहंकार'. हा नाही असा सामान्य माणूस नाही. एकूण मन-बुद्धी-चित्त व अहंकार हे अंतःकरणचतुष्टय आहे. या चतुष्टयापैकी मन-बुद्धी - अहंकार यांचा विचार शास्त्रकारांनी स्थूल, सूक्ष्म व अव्यक्त अशा तीन स्तरांवर केला आहे. या तिन्हीचा

८३