पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक स्तरावर केला गेलेला आहे.
  आपण सामान्य माणसे मात्र मनाचा फक्त 'भाव-भावना' ह्या दृष्टिकोनातूनच विचार करतो. पण मनाची खोली यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तिचा अंत लागणे कठीण आहे हे आपणास माहीतच नसते. हा स्थूलविचार म्हणजे आधिभौतिक विचार होय. परंतु तो आध्यात्मिक व आधिदैविक स्तरावर व्हावयाची जरुरी असते. हे झाले तरच आपल्या एकूण वर्तनावर व जीवनावरही उत्तम संस्कार होऊन मनाचे उन्नयन होईल. संत ज्ञानेश्वरांनी 'मन' या तत्त्वावर विस्तृत भाष्य केले आहे. (१३.१०९-११६) ते म्हणतात, "मन हे सत्त्वयुक्त असले तरी ते रजोगुणाच्या फांदीवर हेलकावे घेत असते. ते शरीर व बुद्धी यामध्ये राहते. मन शरीर धारण करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे मन म्हणजे अवयवयुक्त जाणीव आहे. मन हे इंद्रियभावाचे मूळ आहे. तेच इंद्रियरूपाने व्यवहार करते.” अशा मनाला जर परमेश्वराशी जोडायचे असेल तर त्याने इंद्रियविषयांचे चिंतन न करता त्या प्रकाशित करणाऱ्या 'स्व'रूपाचे चिंतन करणे आवश्यक आहे. असे चिंतन करता करता त्याच्या दशा-अवस्था थांबतात व ते भावातीत होते म्हणजेच आपणास अ-मन अथवा उद्मन (उन्मनी) अवस्था प्राप्त होते. ही मानवाची मूळ अवस्था. हेच ब्रह्मस्वरूप आहे.

  मनुष्य आणि हे विश्व यांचा परस्परसंबंध काय यासंबंधी आपल्या पूर्वजांनी चिंतन व अनुभूतीतून मिळवलेली सत्ये ही तत्त्वज्ञानरूपाने आपणास उपलब्ध आहेत. आज जग भोगवादी झाले असताना, या भोगवादाच्या महासागरात आपल्या जुन्या ऋषि-मुनींप्रमाणे विश्वाचा व मनाचा मागोवा घेणारे तत्त्वचिंतक बेटासारखे आढळून येतात. अनेक पाश्चिमात्य देशांत देह, मन, आत्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक आहेत. भौतिक शास्त्रांचा अफाट विकास होत असताना त्याही पलीकडे आजच्या मानवाला न समजणाऱ्या आधिभौतिक व आधिदैविक अनंत गोष्टी आहेत ही जाणीव शास्त्रज्ञांना झाली आहे. अनेक शास्त्रज्ञांना मन व बुद्धी हे उभयता मानवी विकासातील महत्त्वाचे घटक आहेत व त्यांना आपण समजतो त्यापेक्षा खोल अर्थ आहे, खोल शक्ती आहे ही जाणीव प्रकर्षाने झाली आहे. शास्त्र म्हणजे कितीही प्रयोग केले तरी तेच उत्तर येणारे असे भौतिक विज्ञान आहे. हे गणिताच्या समीकरणाने सांगता येते. पण हा नियम आध्यात्मिक स्तरावर

८४