पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. यामुळे वैद्यकशास्त्र व ती एकमेकांस पूरक आहेत. उपनिषदे हे एका अर्थी श्रेष्ठ ग्रंथ आहेत. याच्या जोडीला पातंजल योगसूत्रे, हठयोग व आहार हे उपचारा- इतकेच महत्त्वाचे आहेत. उपचार म्हणजे फक्त विकारमुक्ती नव्हे, तर आरोग्याची पुनर्प्राप्ती हे गृहीत धरावयास पाहिजे. औषधे घेऊन कसेबसे जगणे म्हणजे जीवन नव्हे तर कोणीकडून तरी मृत्यू पुढे ढकलणे एवढेच. नैसर्गिक जीवनाला एक आनंद आहे, ताल आहे व त्यात कालाचा विचार निरर्थक ठरतो. कालाला आदी नाही व अंतही नाही. आपण काल मोजतो ते फक्त व्यवहारासाठी. शरीर स्वतःच रोगमुक्ती करून घेण्यास समर्थ असते. प्रत्येकाला ही शक्ती असते, पण ती राखेखाली झाकलेल्या निखाऱ्याप्रमाणे असते. ही अज्ञानाची राख झटकून टाकली तर ज्ञानाचा धगधगीत अग्नी प्रदीप्त होतो व विकार जाळून टाकतो."
 'वैद्यक आणि साक्षाकारी अनुभव' ह्या भागात वैद्यकशास्त्राच्या पलीकडे काय आहे, ह्याची विस्तृत चर्चा आहे. मंत्र-तंत्र, तीर्थ-अंगारा, 'ब्लॅक मॅजिक',अशा निरनिराळ्या प्रकारांचे मनावर काय बरे-वाईट परिणाम होत असतात ह्याची चर्चा आहे.
 'प्रतिभा व प्रतिमा' ह्या शीर्षकात आरोग्याची खरी शिडी काय याचे वर्णन आढळते. ही शिडी म्हणजे अध्यात्म, आहार, व्यायाम व योगाभ्यास व शेवटी औषधोपचार. यालाच दादा सर्वांगीण पद्धत म्हणतात व त्याचा ते उपयोग करतात. "श्रद्धेमुळे दगडाला देवपण येते. तीच गोष्ट मानवाची. ही उन्नत अवस्था मंत्र, तीर्थ, अंगारा यांना शक्ती देत असते. तीच नसेल औषधांचा काहीही गुण येणार नाही. कितीही श्रेष्ठ डॉक्टर त्या रुग्णाला विकारमुक्त करू शकणार नाही. पण श्रद्धा असेल तर पदवीने साधा व मनाचे मांगल्य जपणारा, करुणा असणारा वैद्यसुद्धा अवघड केसेस बऱ्या करतो. औषधे देण्याऐवजी 'प्लॅसिबो' देऊनही रोगी पूर्ण बरा होतो." (हा माझाही अनुभव आहे.) “ह्या विशाल मनःशक्तीचे रूप आपल्याला प्रतिमा, हिप्नॉटिझम्, स्पर्शोपचार अशा गोष्टीत आढळून येते. तसेच संगीत व ताल हो हृदयविकार, शल्यचिकित्सा झालेल्या रुग्णावर सुपरिणाम करतात."

 ध्यानधारणा, पूजा, जप, प्रार्थना या गोष्टींना निश्चित महत्त्व आहे,हे विज्ञानवाद्यांनाही पटू लागले आहे. याला अनुसरून अष्टांग योग, हठयोग याची