पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डॉ. डॉसी : “हे ठीक आहे, पण तू बरोबर आहेस याची खात्री करून घेण्यासाठी आपण तुझ्या पोटाची तपासणी करू व नंतर सोनोग्राफी करू."

एलिझाबेथने हे कबूल केल्यावर तिची तपासणी करून सोनोग्राफीसाठी त्या खोलीत दोघे गेले. डॉ. डॉसींनी त्या रेडिओलॉजिस्टला बोलावून सर्व पूर्वकल्पना दिली. तो रेडिओलॉजिस्ट म्हणतो की, "असे स्वतः चे दुखणे काय आहे हे सांगणारे अनेक रुग्ण मी पाहिले आहेत. परंतु नंतर त्यांचे म्हणणे अयोग्य ठरते. यासाठी ‘एक्सरे, कॅट्स्कॅन' या तपासण्या पूर्ण सत्य सांगतात.” तिच्या तपासण्या करण्यास सांगून डॉ. डॉसी आपल्या खोलीत परतले. प्रत्यक्ष तपासणीनंतर तो तज्ज्ञ डॉर्सीकडे आला व एलिझाबेथचे म्हणणे पूर्ण सत्य असल्याचे सांगू लागला. पुढे तिचे ऑपरेशन केल्यावर डाव्या डिंबग्रंथीवर असणारे तीन सिस्ट काढल्यावर ती पूर्ण बरी झाली. येथे तेथील सर्वांनाच हा प्रश्न पडला की एलिझाबेथ स्वतः च्या देहांतर्गत विकाराचे निदान इतके पूर्णपणे कसे करू शकली? अशी कोणती दैवी शक्ती तिच्याकडे आहे? सारांश एवढाच की, कोणीही व्यक्ती योग्य तपश्चर्येनंतर ही शक्ती मिळवू शकते. हेच पातंजल योगशास्त्र सांगते. परंतु आधुनिक वैद्यकतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ किंवा 'विज्ञाननिष्ठ असे कबूल करत नाहीत. मन हें देहात आहे, मेंदूत आहे व त्याला अशी दिव्यशक्ती मिळवणे अशक्य आहे हाच ह्या बुद्धिवंतांचा हेकेखोरपणा. पण आपले मन फक्त देहाचा बाह्यविचारच करू शकते हे असत्य आहे. ते विश्वाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांत भरारी मारू शकते.
मनाचे देहावरील प्रभुत्व :

 भारतीय तत्त्वज्ञानाचे पाश्चात्य, विशेषतः अमेरिकन लोकांत किती आकर्षण आहे हे आपण पाहतो. त्यामुळे अनेक अमेरिकन्स येथे येतात, अनेक स्वामींकडे (?) जातात. भौतिकवादापलीकडे अनंत गोष्टी आहेत, पण आपणास त्या आकलन होत नाहीत. त्यांचे आकलन होण्याचा मार्ग म्हणजे तत्त्वज्ञानाचा शक्य तेवढा अभ्यास व पातंजल योगसूत्रे व हठयोग यांचा प्रदीर्घ अभ्यास व तसे आचरण. हिलाच योगसाधना म्हणता येईल. यातूनच अशा शक्ती मिळू शकतात की त्यायोगे देहाच्या चलनवलनाचे, अथवा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे नियम ती व्यक्ती सहज बदलू शकते. अशा शक्तींनाच सिद्धी असे नाव आहे. पातंजल योगसूत्रे पतंजलींनी

८९