पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांच्यांत झाली होती.
  फ्रॉइड हा फार मोठा मानसशास्त्रज्ञ. त्याने स्वप्नांचे विश्लेषण केले आहे. त्यानंतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी याची उकल करण्याचे प्रयत्न केले. स्वप्नात काय दिसत नाही? लघवी, शौच, जेवण इथपासून पाण्यात पोहणे, बुडणे, हवेत पक्ष्याप्रमाणे उडणे, नग्नता, मैथुन, परीक्षा व आपल्याला काही येत नाही, स्वप्नात चोर-दरोडेखोर दिसणे, भुतेखेते, हडळी, त्यांचे नाच व मशाली अशा अनंत गोष्टी. स्वप्ने शकून, अपशकून सांगतात. या सर्वांचा संबंध रोजच्या जीवनातील घटना, , मानवी संबंध, प्रकृती यांच्याशी लावला जातो. फ्रॉइडच्या सायकोॲनलिटीकल दृष्टिकोनाशी त्याच्याच शिष्याने - युंगने मतभेद प्रकट केले होते.
  अलीकडील काळातील जे बी प्रीस्टले या विद्वानाने मानव व काल (Man and Time) हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाची गणना एक अजोड वैचारिक पुस्तक म्हणून तज्ज्ञांनी केली आहे. इतर वैश्विक सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्याला चांगली वा वाईट पूर्वसूचना देणाऱ्या स्वप्नाविषयी अतिशय ओढ होती. रेडिओवरून त्याने जनतेला त्यांना पडणाऱ्या स्वप्नांची खुलासेवार माहीती पाठविण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद कल्पनेपेक्षा अफाट मिळाला. या ढिगावारी आलेल्या पत्रांचा सखोल अभ्यास करून त्याने काही सत्यांश शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील 'भास' या गटात येणारी स्वप्ने बाजूला करूनही निश्चित स्वरूपाची स्वप्ने त्याने निवडली. या अभ्यासाचा सारांश म्हणून काही तत्त्वे त्याने सांगितली आहेत.
  (१) पूर्वसूचनेने मिळणारे ज्ञान, टेलिपथी, दिव्यदृष्टी म्हणजे अंतर्मनाच्या चक्षूंनी माहीती मिळणे व मिळवणे ही अलौकिक शक्ती आहे.
  (२) ही शक्ती फक्त काही लोकांमध्येच अपवादात्मक नसून सर्वांना प्राप्त होणारी अशी शक्ती आहे.

  पूर्वी आपल्याकडे 'स्वप्ने भविष्य सांगतात', 'शकून-अपशकून' हे सांगणारी पुस्तके सहज बाजारात उपलब्ध होती. उपनिषदात स्वप्नांची मीमांसा केलेली आहे (बृ. उ. ४-३-९-२८) हे पूर्वी आपण पाहिलेले आहेच. वेद तर त्याही पूर्वीचे. ऋग्वेद हा पहिला वेद. याच्या परिशिष्टात याचे उल्लेख आहेत. हे सर्व भारतीय

९४