पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तत्त्वज्ञान ऋषि-मुनींच्या चिंतनामधून निर्माण झालेले आहे. यालाच जणू पूरक किंवा आधारभूत विचार आधुनिक तत्त्ववेत्त्यांनी व विचारवंतांनी मांडलेले आहेत. यामुळे आपले तत्त्वज्ञानातील विचार ही कालबाह्य गोष्ट आहे किंवा त्या भाकडकथा आहेत असे मानणे अयोग्य ठरेल. काही तत्त्वे कालातील असतात. ती अचलही असतात म्हणजे त्यांच्यावर ह्या निरवधी कालाचा काहीही परिणाम होत नाही. आपण ती समजू शकत नाही कारण आपल्या बुद्धीची झेप तेवढी नसते. त्यामुळेच आपण त्यांना कल्पनेचे खेळ असे समजतो व म्हणतो.

  या कालातीत गोष्टींचा जेव्हा केव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा तो अतिशय अचानक असतो. इतका की सामान्य माणसांचा त्यावर विश्वासच बसू शकत नाही. यालाच आपण साक्षात्कार म्हणतो. अनेक वर्षे तपश्चर्या केल्यावर गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखाली साक्षात्कार झाला. ही झाली जुनी कथा. आधुनिक काळात सुद्धा शास्त्रज्ञांना अत्यंत अचानक काही कल्पना सुचतात. त्या प्रयोगाद्वारे ते सिद्ध करतात. हीही एका अर्थी साक्षात्काराची छोटी झलकच. आर्किमिडीज स्नानासाठी पाण्याने भरलेल्या टबमध्ये बसला व त्याच्या आकाराइतके पाणी बाहेर पडले, तेव्हा 'सापडले, सापडले' (युरेका युरेका) असे ओरडत तो 'जन्म होतानाच्या अवस्थे' तच पळत सुटला. हा पुढे आर्किमिडीजचा सिद्धान्त म्हणून प्रसिद्ध झाला. येथे प्रांत, देश, भाषा, जात यापलीकडे येणारा हा अनुभव असतो. यामागे त्या विषयाचे अफाट चिंतन असते व त्याचा परिणाम म्हणजे आपले मन त्या अज्ञात प्रदेशात मुक्तपणे हिंडून ते ज्ञान, ती माहीती आपणास देत असते. हे सर्वांना जमणार नाही. कारण यासाठी तपश्चर्येची जरुरी असते. हेच तत्त्व ऑर्थर कोस्लर किंवा आल्बर्ट आईनस्टाईन यांनी सांगितले आहे. आईनस्टाईन म्हणतात, “भाषा ही फक्त माध्यम आहे. यामुळे शब्द किंवा भाषा यांचा विचारांशी व चिंतनाशी प्रत्यक्ष असा काहीही संबंध नसतो. हे विचार जेव्हा तुम्हाला सांगावयाचे असतात किंवा लिखित स्वरूपात सांगावयाचे असतात त्याच वेळी शब्द व भाषा याची जरुरी तीव्रतेने भासू लागते. सुयोग्य शब्द - त्या त्या भाषेतील चटकन सुचणे हे कठीणच असते." विचार किंवा चिंतन यांत हे कष्ट मुळीच नसतात. फक्त तुम्ही तेथे मनाने असावे लागते. रोजच्या जीवनात आपणास हा अनुभव नेहमी येतो. आपणास अनेक गोष्टी माहीत असूनही त्या परिणामकारकरीत्या आपणास सांगता वा लिहिता येत नाहीत. उत्तम लेखक

९५