पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा कवी जेव्हा उत्कृष्ट कथा वा कविता लिहितो. तेथे सुद्धा तो त्या विशिष्ट वातावरणात विचारांनी जातो व नंतर भाषाप्रभुत्वाच्या जोरावर असामान्य कलाकृती निर्माण करतो. असे जे अनुभव येत असतात ते स्थानिक (Local) नसतात, तर वैश्विक असतात. असे हे जे साक्षात्कार, ते अचानक होत असले तरी सुयोग्य काळीच होत असतात. आणि ते अत्यंत परिपूर्ण असतात. त्यामुळे जी प्रतिमा आपल्या अंतक्षूंसमोर येते ती संपूर्ण, सुस्पष्ट व ज्ञानपूर्ण असते. असे हे विचार जेव्हा अकस्मात येतात तेव्हा ते सत्याचे संपूर्ण चित्र देतात. त्यांना इंग्रजी भाषेत इन्ट्युइशन (Intuition} वा इन्ट्युइटिव्ह फंक्शन (Intuitive Function) असे म्हणतात. ही इन्ट्युइशन येते कोठून, हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही.

  आजचे या विषयावर ज्यांनी संशोधन केले आहे असे नोबेल पारितोषिक विजेते रॉजर स्पेरी यांनी व इतर न्यूरोफिजिऑलॉजिस्ट यांनी अशी संकल्पना मांडली आहे की “ही जी अंतर्ज्ञानाची शक्ती आहे ती मेंदूच्या उजव्या भागात असते तर नेहमीच्या बुद्धिवाद, उपपत्ती वा सरळ विचार करण्याच्या शक्तीचे केंद्र मेंदूच्या डाव्या भागात असते. अंतर्ज्ञानाने मिळालेले ज्ञान शब्दांत सांगणे कठीण असते तर वैचारिक शक्तीने मिळालेले ज्ञान स्पष्ट शब्दांत सहज व्यक्त करता येते." जंग यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा अंतर्ज्ञानाने ज्ञान मिळवत असतो तेव्हा एक प्रकारे योग्य गोष्ट केल्याप्रमाणे आनंद मिळतो. ह्याचे कारण काय? आपण अंतर्मनाची शक्ती जागृत केल्यामुळे असेल का? कारण सर्वच मानवांच्या मेंदूत बुद्धिवादी व अंतर्मनाची शक्ती मेंदूच्या डाव्या व उजव्या भागांत असतात. पण असे होत नाही. काही जणांचीच ही अंतर्ज्ञानाची शक्ती जागृत असते. येथेही आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ज्याला आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान झाले आहे तोच साधू इच्छेनुसार ही शक्ती जागृत करू शकतो, अखिल विश्वाचे दर्शन बसल्या जागी घेऊ शकतो. येथे एक गोष्ट स्पष्ट होऊ लागते की, ज्याला मन म्हणून आपण ओळखतो त्याला तीन स्तर दिसतात. छांदोग्य उपनिषदात आरुणींनी अन्नाबद्दल असे म्हटले आहे की, अन्नाच्या बाहेरचा भाग म्हणजे चोथा मलरूपाने बाहेर टाकला जातो, मध्य भागाचे रक्त-मांस तयार होते तर त्याचा अंतर्भाग किंवा गाभा मन घडवत असतो. तसेच या मनाचेही तीन स्तर असावेत असे दिसते. एक बाह्य स्तर, ज्याचा विचार खूपच झाला आहे. त्याला आधुनिक नाव मानसशास्त्र व विकारविषयक मानसशास्त्र (Psychology

९६