पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्ग आहेत. एक साकारवादी व दुसरा निराकारवादी. निराकारवाद सर्वांना जमतोच असे नाही. सामान्य माणसांनाही भक्तिमार्ग म्हणजे सहज सुलभ योगसाधना. साकारवादी व निराकारवादी दोघेही तसे एकाच भगवंताचे ध्यान व सेवा करत असतात. साकारवादी प्रतीकात्मक ब्रह्माचे तर निराकारवादी अव्यक्त ब्रह्माचे ध्यान करतो. दोघांची श्रद्धा समान असेल तर मार्ग हा दुय्यम ठरतो. ज्यांना निराकारस्वरूप समजत नाही त्यांना भक्तिमार्ग हा सोपा मार्ग आहे. हाच नियम दैनंदिन जीवनाला लागू करता येतो. जेव्हा आपण, आपली पत्नी, मुले, भाऊ-बहिणी अशा जवळच्या व्यक्तीवर निरपेक्ष प्रेम करतो तेव्हा आपला अहंभाव नष्ट होतो. काम-क्रोध हे षड्रिपू पूर्ण नष्ट होतात, निदान पूर्णपणे काबूमध्ये राहतात. या सर्व गोष्टींचा अंतिम उद्देश काय? तर कैवल्यप्राप्ती, वैकुंठप्राप्ती. सामान्यपणे जन्म आणि मृत्यू हे साखळीचे दोन दुवे आहेत. खरे म्हणजे आपण जन्मही घेत नाही व मरणही पावत नाही कारण हे एक आत्म्याचेच रूप आहे. आणि मृत्यू असेल तर पुनर्जन्मही आहेच. पण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती व आत्म्याच्या मूळ स्वरूपात कायम वस्ती म्हणजेच वैकुंठवास. भक्तजनांची किंवा इतर योग्यांची हीच अंतिम इच्छा असते. यासाठी योगी योगसाधना करतात. यात हठयोग व पातंजल योग हे दोन्ही योग गृहीत आहेत. पण भक्तिमार्गात याची जरुरी नाही. योगेश्वर कृष्ण म्हणतात, 'माझ्याच ठिकाणी (म्हणजे मी जो भगवंत आहे तेथे) मन स्थिर कर व माझ्याच ठायी सर्व बुद्धी नियुक्त कर म्हणजे मा झ्या ठिकाणीच तू निवास करशील (गीता १२.८). आणि हे शक्य नसेल तर भक्तिमार्गाचा अवलंब कर" (गीता १२.९).

  याचा आपल्यासाठी अर्थ असा की, ध्यानधारणा हा योगाचा महत्त्वाचा भाग. यात भगवंत ही धारणा व स्थिर चित्त हे ध्यान. ही एकाग्रता सर्वांनाच जमते असे नाही. आपण दहा मिनिटेसुद्धा स्थिर चित्ताने - एकाग्रतेने बसू शकत नाही. अशा वेळी भक्तियोगाचा मार्ग अवलंब करावा असे योगेश्वर कृष्ण म्हणतात. भक्तियोग म्हणजे इंद्रियांच्या आणि मनाच्याही शुद्धीकरणाचा सोपा मार्ग आहे. आजच्या भोगवादी युगात सर्वच इंद्रिये भोगाने तृप्त करण्याची चढाओढ लागलेली आहे. त्यामुळे इंद्रिये व मन नेहमी अशुद्धच असतात. भक्तियोग म्हणजे भगवंताविषयी दिव्य प्रेम. भक्तियोगातही यम-नियमांचे पालन गृहीत आहे. यातूनच परमेश्वरावर प्रीती करण्याची प्रवृत्ती स्थिर होते. गीतेच्या १२व्या अध्यायचे सार असे की, सामान्य

९९