पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या समाजात समलिंगी व्यक्तीचा स्वीकार होत नाही तिथे जी समलिंगी व्यक्ती एचआयव्हीबाधित आहे तिला किती त्रास होत असेल याची कल्पना करा. यातील कोणतीच गोष्ट कुणापाशी बोलायची सोय नाही. त्यात परत 'तुम्हा लोकांची हीच (एचआयव्ही/ एड्सची लागण होऊन मरायची) लायकी' असा अमानुष दृष्टिकोन आढळून येतो. एमएसएम पीएलएचए आधार गट (MSM PLHA Support Groups) काही संस्था समलिंगी एचआयव्हीबाधित लोकांसाठी आधारगट व ड्रॉप-इन- सेंटर्स चालवतात. अनिल कदम (सेफ सेलर्स क्लब, हमसफर ट्रस्ट, मुंबई) म्हणाले, "एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट कुणाला दाखवायचा हा समलिंगी आणि एमएसएम लोकांना मोठा प्रश्न पडतो. आपल्या जोडीदाराला किंवा घरच्यांना सांगितलं तर ते आपल्याला सोडून देतील, घरच्यांना आपल्या लैंगिकतेचा संशय येईल का? ही भीती असते. त्यामुळे अनेक वेळा आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं जात नाही आणि म्हणून मानसिक आधार मिळत नाही. त्यात परत एमएसएम आहे हे माहीत असलं आणि एचआयव्हीबाधित आहे हे कळलं तर लोकांची अशांकडे बघण्याची आणि वागायची दृष्टी अजूनच बदलते. काही पीएलएचए गट सरळ सांगतात 'तुम्ही इथे का आलात? तिकडे सेफ सेलर्स क्लबमध्ये जा ना, ते तुम्हाला सोयीस्कर पडेल.' याला कारण अनेक पीएलएचए समलिंगीद्वेष्टे आहेत. त्यांना समलिंगी लोक, बायकी लोक त्यांच्या गटात आलेले आवडत नाहीत. एचआयव्हीच्या प्रगत अवस्थेत शरीरयष्टी जेव्हा खालावते तेव्हा काही लोकांना संशय येतो. एमएसएम आहे हे माहीत असेल तर काही जण सरळ 'तुला एड्स झालाय का?' असं विचारतात. या सगळ्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं. नैराश्य येतं. घरच्यांना आपल्यामुळे त्रास उद्भवू नये, बहिणीच्या लग्नासाठी आपला अडथळा येऊ नये, म्हणून काही जण घर सोडून दुसरीकडे राहायला जायचा विचार करतात. पण जाणार कुठे? आपल्या गावी ? तिथे औषधोपचार मिळणार का? बरं दुसरीकडे राहायला जावं तर आर्थिकदृष्ट्या अनेकांना ते परवडणारं नसतं. हे सगळे प्रश्न समोर असतात, उत्तरं तर काही सापडत नाहीत आणि मग आत्महत्येचे विचार मनात यायला लागतात.” या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाण्यास अशा आधार गटांची फार मोठी गरज आहे. हे गट काऊन्सेलिंगची सुविधा, औषधं, पोषक आहार पुरवतात. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळण्याची मोलाची कामगिरी बजावतात. इंद्रधनु... १०६