पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समलिंगी व्यक्तींसाठी आधारसंस्था समलिंगी व्यक्तींचे वैयक्तिक व सामाजिक प्रश्न बघता त्यांना आधार देणाऱ्या संस्थांची गरज असते. गेल्या दहा वर्षात समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या संस्था सुरू झाल्या आहेत. या संस्था मुख्यतः मोठ्या शहरातच आहेत. समलिंगी लोकांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणं, आधारगट चालवणं, काउन्सेलिंगची सुविधा पुरविणं अशा तऱ्हेची विविध कार्य अशा संस्था करतात. देणग्यांतून, आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्थाचे उपक्रम राबवून या संस्था चालवल्या जातात. संस्थेची प्रसिध्दी ही सगळ्यात मोठी अडचण असते. काही सनातनी लोकांचा अशा संस्थांना विरोध असल्यामुळे संस्थांना प्रकाशझोतापासून दूर राहावं लागतं. याचा परिणाम असा होतो की ज्या लोकांपर्यंत संस्थेला पोहोचायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहचता येत नाही. अनेकांना आपण शोधत असलेली संस्था पलीकडच्या गल्लीत आहे, हे माहीत होत नाही. बहुतेक वेळा अशा संस्था 'वर्ड ऑफ माऊथ' प्रसिध्दीवर चालतात. आता इंटरनेटमुळे समलिंगी मुला/मुलींपर्यंत काही प्रमाणात पोहोचता येतं. हा प्रसिद्धीचा प्रश्न मोठ्या शहरात तर आहेच पण छोट्या शहरात, गावात तर खूप बिकट आहे. त्यामुळे असंख्य पुरुष/स्त्रियांना या संस्थांची गरज असूनसुद्धा त्यांच्यापर्यंत या संस्था पोहोचू शकलेल्या नाहीत. संस्थेचं नाव जरी कळलं, इ-मेल आयडी मिळाला, हेल्पलाईन फोन नंबर मिळाला तरी अशा संस्थेशी संपर्क करायला लोकांचं धाडस होत नाही. संस्थेत यायला लोक घाबरतात. "तुम्ही राग मानू नका पण मी तुम्हाला आतापर्यंत तीन वेळा फोन केला आहे, आणि तुम्ही फोन उचलला की मी लगेच रिसीव्हर ठेवून द्यायचो. तुमच्याशी बोलायचं धाडसंच व्हायचं नाही.” “मी महिन्यापूर्वी तुमच्या दारापर्यंत आलो होतो. आत यायच्या वेळी पाय कापायला लागले. तिथून परत फिरलो." कोणी तरी आपल्याला त्या संस्थेत जाताना बघेल, कोणी तरी आपल्याला ओळखेल. तिथले कर्मचारी आपलं नाव विचारतील अशा नाना शंका मनात येतात. (या संस्थेत गेल्यावर कोणीतरी आपल्यावर जबरदस्ती करेल अशी भीती काहींच्या मनात असते.) काहीजण फोन करून किंवा ई-मेलवर विचारतात की, "आपण बाहेर भेटू यात का? एखाद्या रेस्टॉरंटमध्ये? एखाद्या बागेत ?” सुरुवातीला चार लोकांत, दिवसाढवळ्या भेटणं ही त्यांच्यासाठी सुरक्षित जागा असते. कारण त्यांचा संस्थेवर विश्वास नसतो. काही जण बराच काळ विचार करून मग भीत भीत संस्थेवर येतात. इंद्रधनु