पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा संस्थांना आर्थिक मदत मिळणं खूप अवघड असतं. या समाजाचे प्रश्न समजून घेणारे खूप कमी असतात. अशा कार्याला हातभार लावणारे कमी असतात. देणग्या मिळण्याची वाण असते. समलिंगी समाजातसुद्धा या कार्याचं महत्त्व कळत नसल्यामुळे समलिंगी लोकांचा आधार मिळणंही खूप कठीण होतं. विदेशी आर्थिक साहाय्य जास्त करून एचआयव्ही/ एड्सच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांना मिळतं. मानसिक आरोग्यासाठी, अँडव्होकसीसाठी पुरेशी मदत मिळत नाही. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे ही जाण अजूनही या देशात आढळत नाही. समलिंगी समाजाच्या बरोबर काम करणाऱ्या फार थोड्या संस्था दर्जेदार सुविधा पुरवतात. अनेक संस्थांच्या विश्वस्तांना, कार्यकर्त्यांना समलिंगी समाजाच्या प्रश्नांबद्दल काहीही तळमळ नसते. यातील काही संस्था समलिंगी लोकांनीच चालवल्या आहेत. समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी लढण्याच्या नावाखाली कोणतीही नीतिमत्ता न पाळता केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी हे लोक हपापलेले आहेत. हे समलिंगी समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सज्जनपणे काम करणाऱ्या चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवणाऱ्या संस्थांची प्रत्येक शहरात, गावात गरज आहे. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी काही तुरळक संस्थांचा अपवाद सोडता बहुतेक शहरांत, गावांत अशा संस्था नाहीत. अनेक जण परगावाहून अनेक तास प्रवास करून एक-दोन तास एखाद्या जाणकार समलिंगी व्यक्तीशी या विषयावर मोकळेपणानं समोरा-समोर बसून बोलता यावं यासाठी येतात. (पण 'पिकतं तिथं विकत नाही' या म्हणीप्रमाणे जिथे अशा संस्था आहेत तिथे स्थानिक लोकांचा वावर कमी आहे.) विवेक आनंद म्हणाले, "उद्या 'हमसफर' ट्रस्टची कोणाला जरूर पडली नाही तर मला ट्रस्ट बंद करायला खूप आनंद वाटेल. कारण याचा अर्थ लैंगिक अल्पसंख्याकांना जगात मोकळेपणाने वावरणं सुरक्षित झालं आहे असा होईल, आणि म्हणून त्यांना या ट्रस्टची जरूर भासणार नाही. पण अजून तरी तो दिवस आलेला नाही." + ११४ इंद्रधनु ...