पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समलिंगी अधिकारांसाठी चळवळ समलिंगी अधिकारांची चळवळ सुरू व्हायच्या वेळी समलिंगी समाजात दोन प्रवाह बनले. एका प्रवाहाचं मत पडलं की " हा गे, तो स्ट्रेट ( भिन्नलिंगी) अशी कोणतीच लेबल्स आम्हाला मान्य नाहीत. आपण सगळे माणूस म्हणून एकमेकांना स्वीकारलं म्हणजे झालं. लेबल्स लावण्यापलीकडे आपण गेलं पाहिजे." तर दुसरा प्रवाह म्हणत होता की, “आपले अधिकार मिळवण्यासाठी आपलं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. त्याशिवाय अधिकारांसाठी झटता येणार नाही." अशोक राव कवी म्हणाले, “आपला समाज, सगळेजण भिन्नलिंगी आहेत किंवा असले पाहिजेत या विचारसरणीवरच आधारित आहे. भिन्नलिंगी लोकांना जे अधिकार आहेत ते समलिंगी लोकांना आहेत का ? समलिंगी जोडप्यांना लग्न करता येतं का ? मूल दत्तक घेता येतं का? भिन्नलिंगी जीवनशैली समोर ठेवूनच समाज व्यवस्था तयार केली गेली आहे. या चौकटीत न बसणाऱ्यांनी काय करायचं? इतके दिवस सहन केलं. पुढेही तेच करायचं का ? मागच्या दशकात समलिंगी लोक एचआयव्हीची लागण होऊन माहिती / सुविधांअभावी मरत होते. त्यावेळी लेबल्स न मानणाऱ्या लोकांनी यांच्यासाठी काय काम केलं ? काहीही नाही. हा वाद पांढरपेशी लोकांचा आहे. सगळ्या गोष्टी इंटलेक्च्युअलाइज करायच्या आणि आमच्या कामातून जो फायदा मिळतो तो चुपचाप पदरात पाडून घ्यायचा. आज पंधरा वर्षं मी हेच बघतोय.” समलिंगी समाज हा भिन्नलिंगी समाजाइतकाच तुल्यबळ घटक आहे. कोणत्याही प्रकारे हा समाज खालच्या दर्जाचा आहे असं दर्शवणारी/ भासविणारी व्यवस्था समाजात असू नये यासाठी ही चळवळ. ही अपेक्षा मानव अधिकाराच्या चौकटीत बसणारी आहे. यात मुख्य अधिकाराची संक्षिप्त मांडणी खाली दिली आहे.

  • प्रौढांमध्ये परस्पर संमतीने आणि खाजगीत केलेला समलिंगी संभोग गुन्हा

किंवा आजार मानला जाऊ नये.

  • समलिंगी जोडप्यांना भिन्नलिंगी विवाहव्यवस्थेशी समांतर कायदेशीर विवाह

व्यवस्था मिळावी. भित्रलिंगी लग्नव्यवस्थेचे सगळे पैलू समलिंगी लग्नव्यवस्थेला लागू व्हावेत. (अवलंबून असलेली व्यक्ती (डिपेंडंट), वारसा हक्क इ.)

  • समलिंगी लोकांवर, समलिंगी कुटुंबावर कोणत्याही क्षेत्रात त्यांची लैंगिकता

विचारात घेऊन भेदभाव/अन्याय होऊ नये (शिक्षण, कायदा, वैद्यकीय क्षेत्र इ.). असा भेदभाव/अन्यायाला आळा घालण्यासाठी कायदे असावेत.

  • समलिंगी व्यक्तींना कोणतीही नोकरी, व्यवसाय करण्यास मज्जाव नसावा.

इंद्रधनु... ११७