पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धार्मिक दृष्टिकोन अनेक शतकांपूर्वी विविध कालखंडात वेगवेगळ्या ठिकाणी विविध धर्मांची स्थापना झाली. प्रत्येक धर्मांनी आपापले रीती-रिवाज बनवले, नीतिमत्ता ठरवली. हे रीती-रिवाज, नीतिमत्ता त्या त्या समाजाला लागू झाली. पुरुषांवर, स्त्रियांवर वेगवेगळ्या त-हेचे निर्बध आले. यातला एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे लैंगिक संबंधांचं नियंत्रण. कोणी कोणाबरोबर लैंगिक संबंध करायचे, कधी करायचे, कोणत्या प्रकारे करायचे याचा उल्लेख बहुतेक सर्व धर्मात दिसतो. या ठरवलेल्या नियमांचं उल्लंघन केलं तर ते पाप समजलं गेलं. वेगवेगळ्या पापासाठी वेगवेगळे शाप दिले गेले, शिक्षा ठरवल्या गेल्या. कालांतराने प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या शाखा बनत गेल्या. प्रत्येक शाखेचे वेगवेगळे नियम बनले. अनेक धार्मिक/आध्यात्मिक शाखांचा पाया विरक्तीवर आधारित आहे. सगळ्या अहिक गोष्टींच्या पलीकडे गेल्याशिवाय मुक्ती नाही, या विचारसरणीला फार कमी अपवाद आहेत (उदा. तंत्रशाखा). लैंगिकसुख घेणं, देणं हे अध्यात्माच्या आड येणारं आहे, म्हणून लैंगिक इच्छेवर काबू मिळवणं जरुरीचं आहे, अशी त्यांची धारणा. पण लैंगिक इच्छेवर मात करणं फार थोड्या जणांना शक्य होईल या वस्तुस्थितीची जाणीव आणि सगळ्यांनीच हा उद्देश साधला तर धर्म जोपासायला कोणी उरणार नाही याची व्यावहारिक जाण याच्यातून लैंगिक संबंध हे विवाहित जोडप्यांनी संतती मिळवण्यासाठी कर्तव्य म्हणून करावेत (पण ते कर्तव्य करताना त्यातून शरीरसुख उपभोगू नये) असा दृष्टिकोन बनला. जिथे भिन्नलिंगी लैंगिक सुख घेण्याबद्दलचा दृष्टिकोन नकारात्मक होता तिथे समलिंगी संबंधांबद्दल तो नकारात्मक असेल तर काय नवल? त्यामुळे समलिंगी संबंधांना कुठल्याही धर्माची मान्यता दिसत नाही. धर्मात समलिंगी संबंध करणं दुराचार, पाप समजलं गेलं. तुलनात्मकदृष्ट्या इस्लाम व ख्रिस्ती धर्मापेक्षा हिंदू, जैन, बौध्द धर्म समलैंगिकतेबद्दल खूप मवाळ आहेत. (याचा अर्थ हिंदू, जैन, बौध्द धर्मात समलिंगी संबंधांना मान्यता आहे असं अजिबात नाही.) हिंदू धर्म मनुस्मृती [4] ८:३६९- जर एखाद्या कुमारी स्त्रीने दुसऱ्या कुमारिकेबरोबर असा संग केला तर तिला दोनशे पण दंड करावा, वधूने (मुलीने) द्यावयाच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम इंद्रधनु ... २७