पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

7 वुल्फेंडेन समिती १९५४ साली वुल्फेंडेन समितीची स्थापना झाली. या समितीत १४ पुरुष व ३ स्त्रिया होत्या, ज्यांमध्ये धर्मगुरु, मानसोपचारतज्ज्ञ, राजकीय पुढारी आदी सदस्य सामील होते. या समितीचे अध्यक्ष होते सर जॉन वुल्फेंडेन, रेडिंग विश्वविद्यापीठाचे उपकुलगुरु. तीन वर्षाच्या कालावधीत या समितीने अनेक धर्मगुरु, पोलिस, मानसोपचारतज्ज्ञ, समाज कार्यकर्ते व समलिंगी लोकांच्या मुलाखती घेतल्या. या सगळ्याचा अभ्यास करून १९५७ साली या समितीने तिचा अहवाल सादर केला. १४ सदस्यांपैकी १३ सदस्यांचं मत झालं की समलिंगी संभोग जर खाजगीत होत असेल, तो राजीखुशीने होत असेल व दोन व्यक्तींचं वय किमान २१ वर्ष असेल तर तो गुन्हा समजला जाऊ नये (जर त्या दोन्ही व्यक्ती लष्करातल्या नसतील तर). अहवालाचे ठळक मुद्दे [28] या अहवालाने समलैंगिकतेचं खंडन केलं, ते अनैतिक आहे असं मत मांडलं, पण त्याच बरोबर सांगितलं की समलिंगी संभोग गुन्हा ठरवणं हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. कायद्याचं काम समाजव्यवस्था सांभाळणं आहे, नागरिकांना इजा होणार नाही याची दखल घेणं आहे, कुणाचं शोषण होणार नाही, अन्याय होणार नाही (विशेषतः समाजातील दुर्बळ घटकांवर) याची खबरदारी घेणं आहे. कोण कुठल्या त-हेचं खाजगी आयुष्य जगतं, खाजगीत कोणतं वर्तन करतं यात दखल देणं हे कायद्याचं काम नाही. समितीतल्या जेम्स अडैरना हा दृष्टिकोन मान्य नव्हता. त्यांची भूमिका होती की समलिंगी संभोगाला कायद्याने मान्यता दिली तर समलिंगी लोकांना अश्लिल वागणुकीचा परवानाच मिळेल. समितीने समलिंगी असण्याला आजार मानला नाही. पण त्याच बरोबर समितीनी समलिंगी होण्यामागच्या कारणांवर संशोधन व्हावं हेही नमुद केलं. समितीने पुरुष वेश्या व्यवसायावर जास्त निबंध आणावेत अशी शिफारस केली. अहवालावरच्या प्रतिक्रिया हा अहवाल खूप लोकप्रिय व वादग्रस्त झाला. अनेक धर्मगुरु, राजकीय पुढारी, अनेक वृत्तपत्रांनी या अहवालाचं खंडन केलं. समितीने समलैंगिकता हा आजार नाही हे सांगितल्यामुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञही चिडले. लॉर्ड डेव्हलिन म्हणाले की, . समाजाने काही ठरवलेल्या नीतिमत्तेवर समाज आधारित आहे. समलिंगी संबंधांना जर मान्यता दिली तर समाज टिकणार नाही. समलिंगी संबंध सहनशीलतेचा अंत बघतात. अशा काही विशिष्ट कारणांसाठी खाजगीत केलेले व्यवहारही सार्वजनिक नीतिमत्तेत आणले पाहिजेत. (म्हणजे कायद्याने खाजगी व्यवहारात दखल दिली पाहिजे.) इंद्रधनु ... ३७