पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्यकीय दृष्टिकोन - प्राथमिक माहिती - लैंगिक कल (Sexual Orientation) वयात येताना मुला/मुलींच्यात शारीरिक आणि मानसिकदृष्टया विविध बदल व्हायला लागतात. वर्गातील किंवा शेजारी राहणारी एखादी व्यक्ती खूप आवडू लागते. त्या व्यक्तीकडे सारखं लक्ष जातं, तिच्याबद्दल आपुलकी वाटते आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीशी शरीरसंबंध करायची इच्छा उत्पन्न होते. वयात येताना अनेक मुलांना भावनिक व लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. तसंच अनेक मुलींना भावनिक व लैंगिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. अशा विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षणाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. काही मुला/मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. अशा भावनिक व लैंगिक आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल म्हणतात, काही मुलां/मुलींना फक्त त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. मुलांना फक्त मुलांबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. तसंच मुलींना फक्त मुलींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. अशा लैंगिक आकर्षणाला समलिंगी लैंगिक कल म्हणतात. एक सैध्दांतिक शक्यता आहे की एखाद्या व्यक्तीला पुरुष व स्त्री या दोघांबद्दलही अजिबात भावनिक व लैंगिक आकर्षण वाटत नाही. समलैंगिकता या शब्दाबद्दल थोडंसं डॉ. भूषण शुक्ल म्हणतात, “समलिंगी हा शब्द उच्चारला की लोकांसमोर फक्त शरीरिक पैलू येतो. भिन्नलिंगी व्यक्तींसारखंच समलिंगी व्यक्ती प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं परिपूर्ण नातं अनुभवते हे आपण जाणतो. म्हणून समलिंगी या शब्दाला पर्यायी शब्द शोधला पाहिजे. मला वाटतं समलिंगीच्या जागी 'समसुखी' हा शब्द वापरावा म्हणजे लोकांचा जो संभोगावरचा केंद्रबिंदू आहे तो कमी होईल आणि लोकांना या नात्याच्या भावनिक पैलूंचीही जाणीव होईल." डॉक्टरांची सूचना महत्त्वाची आहे. यावर अनेक लोकांशी संभाषण करून मी असं ठरवलं की समलिंगी हा शब्द अनेकांना परिचित आहे, म्हणून या पुस्तकात तोच शब्द वापरावा. शहरातील समलिंगी 'गे' हा शब्द वापरतात पण हा शब्द भारतात फारसा प्रचलित नाही. तोच शब्द हळू-हळू रुळेल अशी आशा धरू. इंद्रधनु ... ५१