पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसार माध्यमांचा दृष्टिकोन समलिंगीव्देष्टी विचारसरणी विविध माध्यमांतून व्यक्त होत असते. त्याचे इतरांवर काय परिणाम होतात याचा लोकांना अंदाज येत नाही. या विचारसरणीनी कित्येक वेळा आपण आपल्याच जवळच्या मित्रांवर, नातेवाईकांवर अन्याय करत असतो. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपण आपली भीती, असुरक्षितता, द्वेष व्यक्त करत असतो, पसरवत असतो. एक दशकापूर्वी समलैंगिकता हा विषय फारसा बोलला जात नव्हता. त्याच्यावर फार क्वचित लिहून यायचं. आलं तरीही सूर पूर्णपणे नकारात्मक असायचा. या विषयावर काही संवेदनशील लिखाण वाचायचं असेल तर परदेशी पुस्तकं किंवा मासिकांचा आधार घ्यावा लागायचा. ही मासिकं, पुस्तकं परदेशातून आणण्याचा प्रयत्न व्हायचा. पण अशी पुस्तकं, मासिकं आणण्यात अडचणी यायच्या. 'कस्टम्स अॅक्ट', १९६२, आयपीसी २९२ मुळे अश्लील वाङमय लिहिणं, छापणं, वितरित करणं गुन्हा आहे. कुठल्या साहित्याला अश्लील साहित्य म्हणायचं हा निकष प्रत्येकजण आपल्या सोयीने लावतो. 'त्रिकोण'चा ऑक्टो. १९९७ चा अंक कलकत्त्याच्या कस्टम डिपार्टमेंटनी जप्त केला होता. [58 ] विसाव्या शतकाच्या अखेरपासून हळूहळू बदल व्हायला लागले. या विषयावर इंग्रजी वर्तमानपत्रात, मासिकांत थोडबहुत लिहिलं जाऊ लागलं. सुरुवातीचं लिखाण अभ्यासपूर्ण, संवेदनशील नव्हतं. बहुतेक लिखाण हे समाजमान्य चौकटीतूनच लिहिलं गेलं. (काही समलिंगी व्यक्तीही समलिंगीद्वेष्टे लेख लिहितात. त्यांचा स्वत:बद्दलचा द्वेष या मार्गाने व्यक्त होतो.) हे चालत आलं कारण स्वतःची लैंगिकता स्वीकारलेल्या समलिंगी व्यक्तींनी 'आऊट' होऊन आपली बाजू मांडण्याचं धाडस दाखवलं नाही. सहिष्णुतेने हा विषय मांडायची सुरुवात इंग्रजी मासिकं व वर्तमानपत्रांतून झाली. आता आता मराठी वर्तमानपत्रांत, मासिकांत या विषयावर थोडं लिहिलं जातं. समलिंगी कार्यकर्त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी मिळू लागली आहे. समलिंगी विषयावरची मासिकं १९८०-१९९० च्या दशकात भारतात काही समलिंगी विषयावरची मासिकं काढली जायची. उदा. 'प्रवर्तक', 'सेक्रेड लव्ह'. ही मासिकं लपूनछपून समलिंगी समाजात वाचली जायची. पण बहुतेक समलिंगी समाजाला या मासिकांची माहिती नव्हती. पुढे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी चालवलेली 'त्रिकोण' संस्था 'त्रिकोण' नावाचं त्रैमासिक काढू लागली. पण हे मासिक अमेरिकेत प्रसिद्ध होत इंद्रधनु... ६६