पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिकतेचा स्वीकार जी व्यक्ती स्वतःच्या समलैंगिकतेला स्वीकारते, आणि हळूहळू आजूबाजूच्या लोकांना सांगायला लागते, या प्रक्रियेला 'कमिंग आउट' असं म्हणतात. आपण जसजसं आपल्याला स्वीकारायला लागतो तसतसं आपण कोण आहोत हे लपवून ठेवणं दुटप्पीपणाचं वाटायला लागतं. हे दुटप्पी धोरण स्वीकारून आपण आपल्यावर अन्याय करतो आहोत असं वाटायला लागतं. आपलं आपल्यावर प्रेम आहे ना? आपण आपल्याला स्वीकारलं आहे ना? मग आपण कोण आहोत ते जगाला का सांगू नये? आपली लैंगिकता इतरांना सांगितल्यावर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतील याची जाणीव असून सुद्धा आपली लैंगिकता इतरांना सांगणं हे त्या समलिंगी व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं बनतं. कोणाला सांगू? कधी सांगू? कसं सांगू? याचा विचार सुरू होतो. प्रत्येकाचा 'कमिंग आउट'चा रस्ता वेगळा असतो; कोणाला सांगायचं ही निवड वेगळी असते; कधी सांगायचं ती वेळही वेगळी असते. कुणालाही आपली लैंगिकता सांगायच्या अगोदर त्या निर्णयाचा सर्व बाजूनी विचार करावा लागतो. काहीजणांना 'सरव्हायवल स्किलस्' खूप कमी असतात. कोणापाशी बोलायचं, कधी बोलायचं याचा विचार ते अजिबात करत नाहीत. स्वतःची लैंगिकता स्वीकारायच्या अगोदरच आपण 'आउट' झालो तर कोणते परिणाम होऊ शकतात याचा अजिबात विचार न करता, भावनाविवश होऊन कुणासमोरही 'आउट' होतात आणि पस्तावतात. "मी त्याला सांगितलं की मी समलिंगी आहे तर त्यानी तडक माझ्या घरी जाऊन आई-वडिलांना सांगितलं की, तुमचा मुलगा काय म्हणतोय बघा. आता घरच्या सगळ्यांना कळलंय की मी कोण आहे आणि ते मला सारखी नावं ठेवत असतात. " 'आऊट' व्हायच्या अगोदर खालील मुद्यांचा विचार व्हावा ‘आउट’ होणं हे आयुष्यभर टप्या टप्प्यानी चालू असतं. आज एकाला सांगितलं पुढच्या महिन्यात दुसऱ्याला सांगितलं अशा तऱ्हेने 'आउट' होणं चालू असतं. प्रत्येक व्यक्तीला सांगताना ती व्यक्ती कोण आहे, ती वेळ योग्य आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण 'आउट' व्हायला लागतो तेव्हा, ती व्यक्ती आपली इच्छा नसताना सगळ्या जगासमोर आताच आपल्याला 'आउट' करणार नाही ना याचा आधी अंदाज घ्यावा. इंद्रधनु... ८८