पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहणं मुश्किल. लेस्बियन मुलींना लग्न करायची जबरदस्ती, लग्न झालं की नवऱ्यांनी केलेला संभोग म्हणजे एक प्रकारचा रेपच', हे सगळं कळायला लागलं. माझी मुलींबद्दलची पक्षपाती वृत्ती कमी होत गेली. ती पूर्णपणे गेली आहे असं मी म्हणणार नाही. पण बऱ्याच प्रमाणात कमी झाली आणि दिवसेंदिवस कमी होत आहे. चार वर्षांनी मी कायमचा भारतात आलो. घरच्यांना सांगितलं की मी 'गे' आहे. घरच्यांना खूप धक्का बसला. आपण आपल्या मुलाला वाढवण्यात कुठेतरी चुकलो, असं त्यांना अपराधी वाटलं. मी सांगायचा प्रयत्न केला की यात कोणाचीही चूक नाही आणि मी आहे तसा सुखी आहे. त्यांना ते पटत नव्हतं. ज्या संस्कृतीत ते वाढले, त्यात त्यांचीही प्रतिक्रिया साहजिकच होती. घरच्यांचे मला ठीक करायचे प्रयत्न चालू झाले. महाराज/बाबाकडे जाऊन झालं. शेवटी मी त्यांना एका मानसोपचारतज्ज्ञाकडे नेलं. त्यांनी माझी बाजू घेऊन सांगितलं की हा बदलणार नाही; समलैंगिकता हा आजार किंवा विकृती नाही; माझ्या आई- वडिलांनी मला स्वीकारावं. हे ऐकल्यावर मी बदलेन ही घरच्यांची आशा संपली. हे सगळं चालू असताना मी पुण्यात महिन्यातून एक 'गे' सपोर्ट मीटिंग भरवायला लागलो. प्रतिसाद खूप कमी होता. इथे माझा दुसरा पुनर्जन्म झाला. अमेरिकेतील स्वप्नं एका वर्षात मोडली. इथली परिस्थिती काय आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. मुलांना लैंगिक शिक्षण नाही, बहुतेक पुरुष-पुरुषांबरोबर (किंवा स्त्रियांबरोबर) लैंगिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरत नव्हते (अजूनही परिस्थितीत फार फरक पडलेला नाही). माझ्या लक्षात यायला लागलं की भिन्नलिंगी पुरुषांनाही बरेच प्रश्न आहेत. प्रश्न फक्त स्त्रियांना, समलिंगी लोकांनाच आहेत हा भ्रम दूर झाला. पुरुषांना आपल्या लैंगिक समस्या सहजपणे मांडता येत नाहीत. स्त्रियांपासून होणारा छळ, लैंगिक संबंध/लैंगिक इच्छेबद्दलची लाज, लैंगिक विषयावरचे प्रश्न/अडचणी मोकळेपणाने कुणाशी बोलणार? नावं न ठेवता कोण अचूक माहिती देणार? अनेकजणांचा बायको (किंवा प्रियकरा) बरोबर लैंगिक इच्छा, गरजांबद्दल संवादच नसतो. त्यामुळे मग अनेक लैंगिक/भावनिक इच्छा अपुऱ्या राहतात आणि म्हणून दोघांनाही मानसिक/शारीरिक समाधान मिळत नाही. स्त्रीने एक विशिष्ट भूमिका घेतली पाहिजे, पुरुषांनी एक विशिष्ट भूमिका घेतली पाहिजे, स्त्रियांसाठी हे नियम, पुरुषांसाठी हे नियम. जेंडर, धर्म, संस्कृतीचे पायात खोडे घालून पुरुष कसा स्वत:च बळी झालाय हे कळायला लागलं. हे सगळं समजून घेताना वाटायला लागलं, की आपण एक संस्था सुरू करावी. या पार्श्वभूमीवर मी मुंबईला 'हमसफर ट्रस्ट'चे संचालक अशोक राव कवी यांना इंद्रधनु ९ ...