पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या जोडप्यांना धर्म, अध्यात्माबद्दल फारशी ओढ नसते किंवा एकाच धर्माचे असतात तिथे या विषयात टोकाचे मतभेद असण्याची शक्यता कमी असते. “आम्ही दोघंही जोडीने पूजा-पाठ करतो. दोघांनाही त्यामुळे प्रसन्न वाटतं. पूर्वी आम्ही धार्मिक उत्सवात भाग घ्यायचो नाही पण हळूहळू कळत-नकळत हे बदललं. उत्सवात आमचे नातेवाईक येतात. आम्हालाही ते बोलावतात आणि वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी आम्हाला त्यांच्या सांस्कृतिक उपक्रमात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हीही आनंदाने या प्रयत्नात सहभागी झालो आहोत.दोघंही एकाच धर्माचे असल्याने आमच्यात मतभेद होत नाहीत. पण काही विनोदी गोष्टी घडतात. तो शैव आहे. मी वैष्णव आहे. त्यामुळे माझी आई घरी आली व पूजेच्या वेळी शंकराचे श्लोक जरा जास्त वाटले तर ती लगेच विष्णूस्तोत्र म्हणून भरपाई करते.” आपली लैंगिकता दोघाही जोडीदारांनी स्वीकारली आहे का? दोघांनी आपली लैंगिकता स्वीकारलेली असणं महत्त्वाचं आहे. एकीकडे नातं जोपासायचं आणि दुसरीकडे त्याच नात्याबद्दल जर मनात लाज असेल तर असं नातं टिकू शकत नाही. उदा. काही जणांवर धर्माचा खूप मोठा पगडा असतो आणि समलिंगी नात्यात विशेषतः संभोगाच्या बाबतीत काही जणांना खूप अपराधी वाटतं. याचा नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. "काही महिने मी त्याच्याबरोबर होतो पण सेक्सबद्दल त्याच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. सेक्स करायची त्याला इच्छा असायची पण त्याला ते पाप वाटायचं. सेक्स झाला की तो लगेच प्रार्थना करायचा आणि परमेश्वराला 'मला माफ कर' असं म्हणायचा. याच्यात कुठेतरी मला माझा, माझ्या प्रेमाचा अपमान वाटायचा. मला वाटलं कालांतरानी त्याचा दृष्टिकोन बदलेल. पण नाही. काडीमात्र फरक पडला नाही. शेवटी मला ते असह्य झालं आणि मी त्याला सोडलं." इन्सर्टिव्ह जोडीदार आपल्या रिसेप्टिव्ह जोडीदाराला आपल्या समान मानतो का? का रिसेप्टिव्ह जोडीदार कमी दर्जाचा आहे अशी इन्सर्टिव्ह जोडीदाराची धारणा आहे? रिसेप्टिव्ह जोडीदार इन्सर्टिव्ह जोडीदाराला समान मानतो का? का तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी रिसेप्टिव्ह जोडीदाराची धारणा आहे? एकमेकांबद्दल समान धारणा नसेल तर हे नातं त्रासदायक ठरू शकतं. काही जोडप्यांमध्ये जो जास्त समजून घेणारा आहे, ज्याला नातं टिकवायची जास्ती जरूर आहे, अशाला वाईट वागणूक मिळते. सगळया तडजोडी त्यानं करणं अपेक्षित असतं. या अशा नात्यात बहुतेक वेळा जो रिसेप्टिव्ह जोडीदार आहे त्याला खालच्या दर्जाचं समजलं जातं. अनेक भिन्नलिंगी जोडप्यात जी 'हायरारकी' (उच्चनीच श्रेणीरचना) असते- पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ, तसंच नातं काही समलिंगी जोडप्यांमध्ये इंद्रधनु ...