पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९५

हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८५ )
नारायणराव गोविंद.

सर्व नवीनच आहेत. बाबासाहेबानीं होतकरू विद्यार्थ्यांस निरनिराळ्या कॉलेजांत राहून अभ्यास करितां यावा म्हणून स्कॉलरशिपाही ठेविल्या आहेत. विद्या शिकण्याकरितां परदेशीं जाऊ इच्छिणारा कोणी हुशारं विद्यार्थी आढळला तर त्यास ते द्रव्यद्वारा चांगली मदत करितांत. मराठी भाषेत चांगले ग्रंथ व्हावे म्हणून ग्रंथकारांस गुणानुरूप ते उत्तेजन देत असतात. ग्रंथवाचनाच्या सोईकरितां संस्थानांत लायब्रऱ्याही सरू करण्यांत आल्या आहेत. एवढयावरून नवीन विद्येविषयीं त्यांचा सर्वथा पक्षपात आहे व प्राचीन विद्येविषयीं अनास्था आहे असें मात्र कोणीं समजूं नये. त्याही विद्येचें महत्व ते जाणून आहेत. इचलकरंजीस त्यांनीं वेदशाळा व शास्त्रशाळा स्थापिली असून आर्यवैद्यक शिकणारांसही त्यांजकडून स्कॉलरशिप मिळत असते.
 विद्याप्रसारासंबंधें वर यत्न सांगितले आहेत त्यांबरोबर आरोग्यरक्षण, औद्योगिक संस्थांची स्थापना, इमारत खातें व संस्थानच्या कारभाराचीं प्रधान अंगे यांजकडेही पूर्ण लक्ष देण्यांत आलें आहे. लोकांस फुकट औषधें मिळावी म्हणून इचलकरंजी व आजरें येथें दवाखाने स्थापिलेले आहेत व गरिबास फुकट ओषध देणाऱ्या वैद्यांस संस्थानांतून मदत मिळत असते. इचलकरंजी येथे शाळा, लायब्रऱ्या, बंगले, कचेऱ्या, थिएटर,गिरण्या वगैरे सर्व नवीन इमारती झाल्यामुळें गांवास मोठी शोभा आली आहे.संस्थानांतील सर्व रस्ते दुरुस्त राखिले जातात. आजऱ्यांपासून १२/१४ मैलांवर एक डोंगर आहे त्यास बाबासाहेबानीं “माधवगिरि' हे नांव देऊन तेथें रहाण्याकरितां सुशोभित बंगले बांधविले आहेत. इचलकरंजी येथें दोन गिरण्या सुरू झाल्या असून रेशम रंगविण्याचा एक कारखाना आहे. आजरें व रांगोळी येथें को-ऑपरेटिव्ह सोसायटया नवीनच सुरू झाल्या आहेत.

२४