पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पृथ्वी भरभरत होती. त्यानें तिच्यावर ती हलूं नये म्हणून पर्वत ठेवले! तेव्हां देवदूतांनी ईश्वराला विचारिलें, 'तुझ्या सृष्टीत पर्वतांहून बळवान काय?'
 'लोखंड. कारण तें पर्वतांनाहि फोडते.'
 'आणि लोखंडांहून बळवान काय?'
 'अग्नि. कारण अग्नि लोखंडास वितळवतो.'
 'आणि अग्नीहून प्रबळ काय?'
 'पाणी. पाण्यानें अग्नि विझतो.'
 'पाण्याहून प्रबळ काय?'
 'वारा.'
 'आणि वाऱ्याहून?'
 'दान देणारा सज्जन! उजव्या हातानें दिलेले डाव्या हातालाहि जो कळू देत नाहीं असा दाता! तो सर्वाहून बळी.'
 मुहंमदांच्या भूतदयेच्या कल्पनेत सारे कांही येई. एकदां ते म्हणाले, "प्रत्येक सत्कर्म म्हणजें भूतदयाच आहे. तुम्ही आपल्या भावांसमोर प्रेमाने व प्रसन्नपणें हंसलांत तर तीहि भूतदयाच आहे. दुसऱ्यानें सत्कर्म करावें म्हणून कधी रागानें बोललात तरी तीहि भूतदयाच. दानाइतकीच अशा उपदेशरूप प्रवचनांची योग्यता आहे. रस्ता चुकलेल्यास रस्ता दाखविणें, आंधळ्यास मदत करणें, रस्त्यांतील दगडधोंडा, काटाकुटा दूर करणे, तहानलेल्यास पाणी देणं, भुकेल्यास अन्न देणें हीं सारीं भूतदयेचींच कम. या जगांत मनुष्य जें कांहीं भलें करील तेच परलोकीं बरोबर येईल. इहलोकींची सत्कर्मे हीच परलोकींची पुंजी. तेंच परलोकचें त्याचें धन. मनुष्य मरतो तेव्हां लोक विचारतात, 'त्याने किती मालमत्ता, किती धनदौलत मांगें ठेविली आहे?' परंतु देवदूत विचारतात, तूं आपल्यापूर्वी कोणती सत्कर्मे पुढे पाठविली आहेस?"
 असे सुंदर उपदेश चालत. एकदां एका शिष्याने विचारलें. "पैगंबर माझी आई मेली. तिच्या आत्म्याच्या शांत्यर्थ मी कोणतं दान देऊ? कोणतें दान उत्कृष्ट?"
 "पाणी. वाळवंटांत पाण्याची टंचाई. पाण्याचा दुष्काळ. तिच्या नांवानें विहीर खण व तहानलेल्यास पाणी मिळेल असें कर." मुहंमद म्हणाले.

इस्लामी संस्कृति । ९५