पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असे लिहून नंतर मुस्लिमांनी एकमेकांशी कसे वागावें त्याचे नियम दिले आहेत. पुढे ही सनद सांगते :
 "शांति वा युद्ध कोणतीहि परिस्थिति असो, ती सर्व मुस्लिमांस समान बंधनकारक आहे. स्वतःच्या धर्माच्या शत्रूशीं परभारा तह वा लढाई कोणीहि करावयाची नाहीं. ज्यूहि आमच्या लोकसत्तेत सामील होत आहेत. तेव्हां त्यांचा अपमान आम्ही होऊं देणार नाहीं. त्यांना कोणी सतावणार नाहीं, याची आम्ही काळजी घेऊ. आमच्या मदतीवर व सदिच्छेवर आमच्या लोकांच्या इतकाच त्यांचाहि हक्क आहे. या यसरिबचे सर्व शाखांचे ज्यू व मुसलमान मिळून एक संयुक्त राष्ट्र होईल. ज्यूंना पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे. त्यांचे पक्षकार व मित्र यांनाहि स्वातंत्र्य आहे, संरक्षण आहे. मात्र जे गुन्हेगार ठरतील त्यांना अवश्य शासन केलें जाईल. सर्व शत्रूंविरुद्ध मदिनेचें रक्षण करण्याचे काम ज्यू मुसलमानांस मिळतील. हा करार पाळणारांस मदिनेचा अन्तर्भाग पवित्र राहील. मुसलमानांचे व ज्यूंचे जे संरक्षित लोक असतील, दोस्त असतील, तेहि सन्मान्य मानले जातील. जे खरे मुसलमान असतील ते अपराध करणाऱ्यांस, अशांति पसरवणाऱ्यांस, अन्याय्य वर्तन करणाऱ्यांस दूर ठेवतील. अगदीं जवळचा नातलग असला तरी त्याचीहि गय करणार नाहींत."
 यापुढें मदिनेचा अन्तर्गत कारभार कसा चालवायचा त्या संबंधी लिहून शेवटी म्हटले आहे कीं :
 "अतः पर जे कोणी हा करार मानतात ते आपली सारी भांडणे ईश्वराच्या आदेशानें त्यांचा निर्णय व्हावा म्हणून पैगंबरांकडे आणीत जातील."
 या कराराने मदिनेंतील भांडणांस मूठमाती मिळाली. आतांपर्यंत जो तो आपल्याच हातीं न्याय घेत असे. सूड घेत असे. अतःपर हें बंद झालें. नव-राष्ट्र निर्माण झालें. मुहंमद पहिले न्यायमूर्ति झाले. ते पैगंबर होते म्हणूनहि व लोकांचा नि त्यांचा तसा खरोखरच संबंध होता म्हणूनहि. ज्यूंच्या कांहीं शाखा मदिनेच्या आसपास रहात असत. त्यांचा या करारांत प्रथम अन्तर्भाव नव्हता. परंतु कांहीं दिवसांनी त्यांनींहि हा करार मान्य केला.
 प्रथम प्रथम ज्यूहि प्रार्थनेस येत, प्रवचन ऐकत. नंतर होणाऱ्या चर्चेत भाग घेत. प्रार्थनेच्या वेळेस प्रथम जेरुसलेमकडे सारे तोंडे करीत. ज्यूंची प्रीति

इस्लामी संस्कृति । ९९